जातेगाव बुद्रुक, ता. 24 ऑक्टोबर 2018 (एन. बी. मुल्ला): विद्यार्थीदशेत लष्करी क्षेत्रातील सेवा संधी निवडताना दैनंदिन घडामोडी, जागतीक घटना, वर्तमानपत्रांचे वाचन, इंग्रजी भाषेचे अद्यावत ज्ञान, आत्मनिरीक्षण, जाणीवपूर्वक अभ्यास या बाबी महत्वाच्या आहेत. या क्षेत्रात भवितव्य साकारणे कामी प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर विक्रमसिंह गायकवाड यांनी केले.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे विद्या संकुलात आयोजित 'लष्करी सेवेतील संधी' या कार्यशाळेत ब्रिगेडियर विक्रमसिंह गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमास प्राचार्य रामदास थिटे, शिरूर विज्ञान संघाचे कार्याध्यक्ष अनिल साकोरे, गीतांजली गायकवाड, दामोदर गव्हाणे, प्रा. गोरक्ष दानवे, विजय वरपे, विशाल जाधव, दशरथ आळवे, जालींदर रणसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ब्रिगेडियर गायकवाड म्हणाले, 'भारतीय संरक्षण सेवेत एनडीए, केंद्रीय लोकसेवा आयोग, मुलींकरिता नर्सिंग सेवा, सशस्त्र सेना आदी क्षेत्रांद्वारे निवड केली जाते. मानसशास्त्रीय चाचणी, मैदानी, वैद्यकीय, मुलाखत, गुणवत्ता चाचणी या क्रमाने उमेदवारांची निवड केली जाते.'
प्राचार्य थिटे म्हणाले, 'विद्यार्थीदशेत मुलांनी भवितव्यातील सेवा संधी निश्चित करत एकलव्याच्या एकाग्रतेने अभ्यास करावा. राष्ट्रीय विकासासाठी संरक्षण क्षेत्रात करिअर ही उत्तम संधी असल्याने जागरूकतेने अभ्यास करावा.' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगर यांनी केले.