ब्राह्मणसुद्धा मराठाच होते: प्रा. रंगनाथ पठारे

Image may contain: 2 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. 15 नोव्हेंबर 2018: शिवरायांनी निद्रीस्त मराठी समाजाला जागे केले. साळी, माळी, मराठा, धनगर या सर्व आठरापगड मावळ्यांना क्षत्रियत्वाचे भान दिले. आपण सारे सोयरेधायरे असल्याची, आपली सर्वांची जनुकं योद्ध्यांची असल्याची जाणीव निर्माण करून तिच्या बळावर त्यांनी स्वराज्य निर्माण केले. देशमुखी वतनं रद्द करून पगारी सैन्य उभे केले. मात्र, आपला इतिहास शिवरायांपासून सुरू होत नसून तो २२०० वर्षांपुर्वींच्या सातवाहनांपासून सुरू होतो. हे राज्य महार आणि रठ्ठ यांनी घडवलेले आहे. मराठा हा शब्द जातीवाचक नसून तो भाषा व प्रदेशवाचक होता, अगदी ब्राह्मणसुद्धा मराठाच होते असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आयोजीत सोनाई व्याख्यानमालेत "महाराष्ट्र : काल व आज " या विषयावर प्रा. रंगनाथ पठारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते होत्या. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, उपसरपंच राकेश भुजबळ, कवी भरत दौंडकर, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, समता परिषदेचे प्रदेश संघटक सोमनाथ भुजबळ, काशीबाई घोरपडे, सोपान बारवकर, ह.भ.प.लक्ष्मण नरके आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. पठारे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा दुष्काळी प्रदेश होता. मलिक अंबरने शेतीला प्रोत्साहन दिले. जमिनींची मोजदाद करून रास्त सारा ठरवून दिला. महाराष्ट्राला गनिमी काव्याचे युद्धतंत्र त्यानेच शिकवले. मराठा सरदारांमध्ये त्याने एकी घडवून आणली, पुढे इंग्रजांनी लूटारूंचा बंदोबस्त केला व सहकारी चळवळीतून धनाची निर्मिती केली. महात्मा फुलेंनी महाराष्ट्राला ज्ञाननिर्मितीची प्रेरणा दिली. राजारामशास्त्री भागवत यांनी आपला खरा इतिहास निर्मळ मनाने शोधून काढला. सहकार, ज्ञान आणि आधुनिक शेतीतून प्रगत महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याचेही यावेळी बोलताना प्रा.पठारे यांनी सांगितले.

यावेळी प्रा. हरी नरके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, विष्णू नरके, रामदास भुजबळ यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल नरके यांनी केले तर सोमनाथ भुजबळ यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या