बनावट 7/12 द्वारे शेतकऱ्यांना पीककर्ज; गुन्हा दाखल

शिक्रापूर, ता. 10 डिसेंबर 2018: करंदी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची बनावट 7/12 व 8अ उतारे बनवून 2 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक एका एजंटाच्या मध्यस्थीने केली. यातील एजंट संतोष नामदेव वाळुंज (रा. शिंदोडी, ता. शिरूर) याच्यावर फसवणूक व कागदपत्रांमध्ये फेरफारीचा गुन्हा रविवारी (ता. 9) शिक्रापूरमध्ये दाखल झाला.

करंदी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत 2014 पासून पुढील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने गुनाट, शिंदोडी, करंदी, जातेगाव बुद्रुक, करंजावणे (सर्व ता. शिरूर), सोनवडी (ता. दौंड) येथील 77 शेतकऱ्यांचे सातबारा व आठ-अ उतारे सादर करून 2 कोटी 8 लाख 4 हजार एवढे पीककर्ज प्रकरण मंजूर झाले. या प्रकरणी बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाला शंका आल्याने त्यांनी करंदी शाखाधिकारी रक्षा दशरथ जाधव यांना 22 ऑक्‍टोबर 2018 रोजी चौकशी करायला लावली. या चौकशीत वरील सर्व 77 मंजूर कर्जप्रकरणातील सर्व उतारे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. यावरून जाधव यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता संतोष नामदेव वाळुंज याने कमिशन घेऊन व बोगस सात-बारा उतारे बॅंकेला सदर करून सर्व कर्जप्रकरणे आम्हाला मंजूर करून दिल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली. परतफेडीबाबत विचारणा केल्यावर यातील पहिल्या 63 खातेदारांनी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज असे एकूण 1 कोटी 83 लाख 64 हजार 772 रुपये बॅंकेकडे परत भरले असून उर्वरित 14 शेतकऱ्यांचे 47 लाख 58 हजार एवढे कर्ज व व्याज रक्कम बॅंकेकडे भरली नसल्याचे स्पष्ट झाले. व्यवस्थापिका रक्षा जाधव यांच्या तक्रारीवरून वरील 77 शेतकऱ्यांसह संतोष नामदेव वाळुंज यांच्यावर फसवणूक, बोगस कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रथमदर्शनी आरोपी संतोष वाळुंज याला अटक करून गुन्ह्याचा तपास केला जाईल. यात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती फौजदार सोमनाथ दिवटे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या