शिरुर, ता. २० डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : विधानसभेची निवडणुक हि अवघ्या काही महिन्यांवर येउन ठेपली असता, त्याचा परिणाम शिरुर-हवेली या मतदारसंघावर इच्छुकांमध्ये सोशल मिडियावर चाललेल्या चढाओढींमध्ये दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडुन अशोक पवार, प्रदिप कंद हे दोघे इच्छुक असून आज माञ बापू अन दादा समर्थकांमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून घमासान संघर्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोक पवार (बापू) तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद (दादा) यांच्यात प्रामुख्याने उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. या दोघांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांमध्ये आतापासुनच समर्थकांमध्ये सोशल मिडियावर जबरदस्त शितयुद्ध शिरुर शहर व परिसरात होत असल्याचे दिसते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी या निवडणुकित कुठल्याही परिस्थितीत उभे राहण्याचा निर्धार केला असून, त्यांनी त्यादृष्टीने शिरुर व तालुक्यात जोरदार तयारी सुरु केली आहे.
दिवाळीमध्ये त्यांनी शिरुर शहरात दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक महेश काळे यांचा स्वर-संध्या हा भावगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे शिरुर शहरात प्रदिप कंद दमदार एंट्री केली असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. शिरुर शहरात कुठलाही छोटा-मोठा कार्यक्रम असो प्रदिप कंद यांची हजेरी उपस्थितांमध्ये लक्ष वेधून घेत आहे. माजी आमदार अशोक पवार यांनीही जोरदारपणे निवडणुकीसाठी तयारी सुरु केली असुन शासनाच्या विरोधातील सर्व आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली हि शहरात पार पडली आहे.त्या आंदोलनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तालुक्यातील घोडगंगा कारखाना, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या सर्व संस्थांच्या निवडणुकांमध्ये पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळविले. राष्ट्रवादीच्या तालुका व शहर मधील ज्येष्ठ व युवक कार्यकारिणीमध्ये आपल्या सर्व समर्थकांची वर्णी लावण्यात त्यांना यश आले आहे.
आजच्या परिस्थितीत कार्यकारिणी अशोक पवार यांच्या मागे तर दुखावलेले नाराज कार्यकर्ते हे प्रदिप कंद यांच्या मागे असल्याचे चिञ दिसत आहे. याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन सोशल मिडियावर (व्हॉट्सअप, फेसबुक) वर द्वंद व जोरदार चर्चा रंगत आहे. जो तो समर्थक आपल्याच नेत्याला कशाप्रमाणे उमेदवारी मिळनार व आमदार होणार हे सोशल मिडियावर दाखवत आहे. शहरातील प्रमुख राजकिय अड्डा बनलेले हॉटेल विसावा व हॉटेल आस्वाद या दोन्ही ठिकाणी या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक कलगीतुरा नागरिकांना पहावयास मिळत आहे.
या दोन्ही ठिकाणी बापु अन दादांच्या समर्थकांमध्ये अनेकवेळा राजकिय कलगीतुरा नागरिकांनी अनुभवला असून बापुंनाच कशी उमेदवारी मिळणार अन तेच कसे निवडुन येणार हे त्यांचे समर्थक सांगताना दिसत आहे. तर दादांनाच कशी उमेदवारी मिळनार अन दादा कसे विजयी ठरतील याबाबत चर्चा होताना दिसते. "लाटेवरचा नेता पहाटेपर्यंत टिकत नाही अन लोकांच्या मनातला नेता शेवटपर्यंत संपत नाही...भावी आमदार प्रदिपदादा कंद" असे स्लोगन कंद समर्थकांकडुन तर बापू समर्थक "आपल्या राजाला साथ द्या, युवकांचे प्रेरणास्थान..मनामनात घराघरात. बापु तुम्हीच २०१९ चे आमदार" असे शेकडो स्लोगन सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.या स्लोगनमुळे भविष्यातील राजकिय वादळाची चर्चा सध्या या दोघांभोवती फिरत असुन यात कोण बाजी मारतयं हेही येत्या काही दिवसांतच कळेल, त्यावेळेस बापु-दादा समर्थक जल्लोष केल्याशिवाय थांबणार नाही हे तितकंच खरं आहे.