शिरूरमध्ये होणार पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा

शिरूर, ता. 22 डिसेंबर 2018: शिरूरमध्ये येत्या महिनाभरात पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू होत असून, शिरूरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू करण्यास केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्यता दिली, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले, "शिरूर लोकसभा मतदारसंघाबरोबरच; जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षण, पर्यटन व इतर नोकरी आणि कामधंदेविषयक कामांसाठी परदेशांत जाणारांची संख्या मुळातच मोठी आहे. गेल्या काही वर्षांत या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज भासत असे. पुण्यातच ही सुविधा उपलब्ध असल्याने या सर्व नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी पुण्याला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यात नागरिकांच्या वेळ व पैशांचाही अपव्यय होत होता. ही गरज ओळखून शिरूरसारख्या ग्रामीण भागात पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा असण्याची गरज केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली व केंद्रानेही ही गरज ओळखून तातडीने अशी शाखा शिरूरला देण्याबाबत मान्यता दिली.''

महिनाभरात शिरूर येथील शाखेमार्फत प्रत्यक्ष पासपोर्ट वितरित करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सध्या पोस्ट ऑफिसमध्येच पार्टिशन करून स्वतंत्र शाखा सुरू केली जाईल. त्यानंतर लवकरच नवीन जागेत या शाखेसाठी सुसज्ज कार्यालय उभे केले जाईल, असेही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शिरूरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू होणार असल्याने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्‍यांतील नागरिकांच्या "पासपोर्ट'साठी पुण्यात चकरा मारणे आता थांबणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या