विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा

Image may contain: 4 people, people sitting and indoor
कान्हूर मेसाई, ता. 23 डिसेंबर 2018: येथील विद्या विकास मंडळाच्या विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना शनिवारी (ता. 22) विषबाधा झाली होती आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

येथील विद्याधाम हायस्कूल शनिवारी सकाळी नियमितपणे भरले होते. शालेय पोषण आहारासाठी मसाले भात तयार करण्यात आला होता. हा मसाले भात मुलांना खाण्यासाठी दिला. मात्र, त्यानंतर थोड्या वेळाने काही मुलांना चक्कर, उलट्या व डोके दुखण्याचा प्रकार सुरू झाला. मुलांना अन्नातून विषबाधा होत असल्याचा प्रकार शिक्षक, मुख्याध्यापक आणि अन्य शाळा प्रशासनाच्या वेळीच लक्षात आला आणि त्यांनी पुढील तत्परता दाखविली व विद्यार्थ्यांवर उपचार केले. या दरम्यान पालक बैठकही आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे शिक्षक व पालकांनी तातडीने मुलांना खासगी रुग्णालयात नेले. शिरूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांना या बाबत माहिती देण्यात आली. त्या वेळी कवठे येमाई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे व त्यांचे सहकारी येथे पोचले. या वेळी त्यांनी 37 जणांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविले. श्रावणी ननवरे, अजिंक्‍य दळवी, ऋतुजा खैरे, अश्‍विनी जगदाळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. दुपारी त्यांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती मिळाली. विषबाधा झालेला भात व अर्धा पोत तांदूळ शाळेच्या मागील बाजूस टाकून देण्यात आला.

नेहमीप्रमाणे आहार बनविताना मी तेथे हजर होतो. आहाराचा नवीन तांदूळ आल्याने तो देखील पाहून उतरवून घेतला. मुलांनी भातात वास येतो, चक्कर, डोके दुखणे व उलट्या याबाबत माहिती दिली. त्या वेळी तत्काळ तो भात फेकून दिला, अशी माहिती मुख्याध्यापक मच्छिंद्र माने प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली.

अस्वच्छता व योग्य प्रकारे आहार बनविण्याची काळजी घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली असावी. दरम्यान, या बाबत शालेय स्तरावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. त्यापाठोपाठ शालेय पोषण तयार करण्याचे काम काढून घेतले जाईल, अशी माहिती विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर पुंडे यांनी दिली.

दरम्यान, पाच विद्यार्थ्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रात्रभर रुग्णालयातच ठेऊन लहान मुलांच्या डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर रविवारी (ता. २३) घरी सोडले जाणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देवून विद्यार्थी व पालकांबरोबर चर्चा केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या