कांदा विक्रीतून मिळालेले 4 रुपये पाठवले कृषीमंत्र्यांना

Image may contain: 1 person, outdoor and nature
टाकळी हाजी, ता. 24 डिसेंबर 2018 : येथील महिला शेतकरी मनिषा संजय बारहाते यांनी कांद्याच्या 32 गोण्या विकल्यानंतर मिळाले फक्त चार रुपये. यामुळे संतापलेल्या मनिषा यांनी ते चार रुपये केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना मनीऑर्डर केले आहेत.

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्ज काढून शेतकऱयांनी कांद्याचे पीक घेतले. परंतु, रात्रं-दिवस काबाडकष्ट केल्यानंतर खर्च तर नाहीच पण मुद्दलही वसूल होत नाही. यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली अडकला आहे. मनिषा बारहाते यांनी कांद्याच्या 32 गोण्या पारनेर येथील एका व्यापाऱ्याला विकल्या होत्या. साधारण एक ते दोन रुपये किलो त्यांच्या कांद्याला भाव मिळाला. त्यातून त्यांना 2362 रुपये एवढी रक्कम मिळाले, मात्र इतर सर्व खर्च वजा करता त्यांच्या हातात केवळ 32 गोण्यांचे केवळ चार रूपये मिळाले.

काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकाला अवघे चार रुपये मिळाल्याने संतापलेल्या मनिषा यांनी मिळालेली रक्कम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग मनीऑर्डर केली. तसेच कृषिमंत्र्यांच्या पत्नीला बांगड्यांचा बॉक्स पाठवून आपला सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला. मनिषा यांच्या या कृतीचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

गेली चार वर्षात सरकारने शेतीमालाच्या भावाचे नियोजन न करता शेतकरी कशाप्रकारे अडचणीत येईल यासाठी धोरणे राबविली आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा वाढत आहे. कर्ज माफीच्या नावाखाली सरकारने नागरिकांना फसवले आहे. कांद्यांच्या उत्पन्नातून शेतकरी कर्जाचे व्याज भरेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यालाही भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, असे मनिषा बारहाते यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या संजय साठे या शेतकऱ्याने त्यांच्या सात क्विंटल 50 किलो कांद्याला लासलगाव बाजारसमितीत केवळ 1 हजार 64 रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान कार्यालयातील आपत्कालीन निधीसाठी देत सरकारचा निषेध केला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या