कोरेगाव भीमाला निर्धास्तपणे या; वाहतुकीत बदल

Image may contain: sky and outdoor
कोरेगाव भीमा, ता. 30 डिसेंबर 2018: येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील असा अंदाज असून, त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता अभिवादनासाठी निर्धास्तपणे या, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (ता. 29) केले.

विजयस्तंभ अभिवादनाच्या दिवशी कोणत्याही सभांना बंदी नाही. मात्र, त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. आतापर्यंत रिपब्लिकन पक्षासह पाच संघटनांना परवानगी देण्यात आली आहे. विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशासाठी आणि परत जाण्यासाठी दोन वेगवेगळी ठिकाणे असतील. भडकाऊ भाषणे आणि जातीय विद्वेष पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. हा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी 1211 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे, असे या वेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होत्या.

प्रवेशबंदीसह इंटरनेटही बंद...
  • गतवर्षी दंगलीत असणाऱ्या 64 जणांना प्रवेशबंदी
  • सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 45 जणांवर कारवाई
  • एक जानेवारी रोजी अंशतः वीज बंद, इंटरनेटही बंद राहणार
  • नागरिकांच्या मदतीसाठी - "आय हेल्प यू' कक्ष आणि पोलिस मदत केंद्रे
वाहतुकीत बदल
  • 31 डिसेंबरच्या रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत काही ठिकाणी वाहतूक वळविणार
  • नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळविण्यात येतील.
  • नगरकडून हडपसर आणि पुण्याकडे येणारी वाहने शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, न्हावरा, केडगाव चौफुला आणि सोलापूर हायवेमार्गे हडपसर पुण्याकडे वळविण्यात येतील.
  • पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने चाकणमार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर, सोलापूर हायवेमार्गे केडगाव चौफुलामार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहेत.

कोरेगाव भीमा येथे दंगलीचे गुन्हे असलेल्यांना प्रवेशबंदी!
पुणे, ता. 29 डिसेंबर 2018 : 'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या परिसरामध्ये सभा घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना परवानगी देण्यात आली असून, दंगलीचे गुन्हे नावावर असलेल्यांना 1 जानेवारी रोजी पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे', अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमादरम्यान झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने यंदा काळजी घेतली आहे. या परिसरामध्ये उद्यापासूनच (शनिवार) दहापट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. कोरेगाव भीमा, विजयस्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर येथे एक जानेवारी रोजी इंटरनेटवर प्रतिबंध असेल. एक जानेवारी रोजी विजयस्तंभाच्या परिसरात पाच मैदानांवर सभा घेण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना पाटील म्हणाले,. 'आनंदराज आंबेडकर, रामसाद आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्या सभांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जाऊ नयेत, यासाठी पोलिसांचा सायबर सेलही कार्यान्वित करण्यात आला आहे. दंगलीचे गुन्हे नावावर असलेल्यांना 1 जानेवारी रोजी पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.'

Image may contain: 1 person, standing, crowd and indoor
चुकीचे मेसेज सोशल मीडियावर टाकू नका: नांगरे पाटील
जातीय तेढ निर्माण होईल असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर टाकू नका. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करून एकजुटीचा संदेश द्या, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. वाघोली येथे लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील, सरपंच, पदाधिकारी, नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी नांगरे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कारेगाव भीमा येथे येणारा प्रत्येक जण शांततेत विजयस्तंभाला अभिवादन करेल. यासाठी एकजूट गरजेची आहे. एकजुटीचा हा संदेशच मागील वर्षी घडलेल्या प्रकाराचा डाग पुसून टाकेल. गैरप्रकार करणाऱ्यांची प्रशासनाकडून गय केली जाणार नाही.’

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या