कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी अलोट गर्दी (व्हिडिओ)

Image may contain: one or more people, crowd and outdoor
कोरेगाव भीमा, ता. 2 जानेवारी 2019: येथील पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी (ता. 1) दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली.

पोलिसांनी विजयस्तंभस्थळी गर्दी एकवटू दिली नाही. पुणे व नगर बाजूकडून येणाऱ्या बांधवांसाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना स्वतंत्र मार्गिका केल्यामुळे विजयस्तंभ प्रवेशस्थळी गर्दी न होता नियोजनबद्ध पद्धतीने अभिवादन सुरू होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांचे बंदोबस्तावर लक्ष होते.

परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलिसांनी विजयस्तंभस्थळी गर्दी एकवटू दिली नाही. पुणे व नगर बाजूकडून येणाऱ्या बांधवांसाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना येण्याजाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्यामुळे विजयस्तंभ प्रवेशस्थळी गर्दी न होता नियोजनबद्ध पद्धतीने अभिवादन सुरू होते. पोलिस प्रशासन तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर ध्वनिक्षेपकावर सूचना देऊन गर्दीचे नियोजन केले. दिवसभर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांचे बंदोबस्तावर जातीने लक्ष होते. त्यांनी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी परिसरातही सकाळपासून भेटी देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

शिक्रापूरकरांकडून पोह्यांचे वाटप
शिक्रापूरकरांच्या ५० पोती पोह्यांचा आस्वाद अभिवादन दिनानिमित्त शिक्रापुरात पोचलेल्या तब्बल ३० ते ३५ हजार जणांनी घेतल्याची माहिती माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी दिली. शिक्रापूर ग्रामपंचायत, शिक्रापूर पोलिस आणि शिक्रापूर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने नियोजन केले होते. दरम्यान, शिक्रापूर आणि परिसरातील बारा बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी गाड्या पार्किंगसाठी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. पेरणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, लोणीकंद, शिक्रापूर, अष्टापूर फाटा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने फूल, पाणी तसेच नाश्‍ता, जेवण देऊन स्वागत करण्यात आले. कोरेगाव भीमा येथेही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने फूल, पाणी देऊन स्वागत करण्यात आले.

बडोले, कांबळे यांच्याकडून ग्रामस्थांचे कौतुक
पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी मंत्री राजकुमार बडोले व दिलीप कांबळे यांनीही भेट देऊन अभिवादन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘आजच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांचे सौजन्य व समन्वयाचे वातावरण; तसेच ग्रामस्थांची एकात्मता कौतुकास्पद आहे. त्यामुळेच कार्यक्रम शांततेत पार पडला.आजच्या या यशाचे श्रेय स्थानिक घटकांबरोबरच प्रशासनाच्या व्यवस्थेलाही आहे.’’

‘तीर्थक्षेत्र जाहीर करा’
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सहा किलोमीटर चालत विजयस्तंभ स्थळी अभिवादनासाठी पोचले. या वेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा जल्लोषात आला होता. ते म्हणाले, ‘‘गतवर्षाच्या घटनेनंतर आंबेडकरी समाज पेटून उठल्याने यावर्षी दुपटीने उपस्थिती वाढली आहे. दरवर्षी ही गर्दी वाढतच जाणार आहे. त्यामुळे सरकारने हे स्थळ तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करून वाढीव सुविधा द्याव्यात.’’ रोहित वेमुला याची आई राधिका वेमुला यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.

वाहतूक कोंडीत मंत्रीही तीन तास अडकले
शौर्यदिन कार्यक्रमामुळे परिसरात अलोट गर्दीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री राजकुमार बडोले, दिलीप कांबळे यांसह अनेक नेते ३- ४ तास अडकले. परिणामी, सभास्थळी जाण्यास आठवले यांना उशीर झाला, तर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर व चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांना गर्दीतून वाट काढत बरीच पायपीट करावी लागली. दरम्यान, अभिवादनासाठी सायंकाळपर्यंत अनेक बांधव येत होते. सायंकाळी आलेल्या बांधवांसाठी जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत अधिकच्या १०० बस सोडल्या. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या अनेक बांधवांची परतीची मोठी सोय झाली.

वढू बुद्रुक येथेही अभिवादनासाठी गर्दी
पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेला लाखो भीमबांधवांचा जनसमुदाय विजयस्तंभास मानवंदना दिल्यानंतर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधिस्थळीही अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात आला होता. प्रशासनाने कोरेगाव भीमा येथून वढू बुद्रुक येथे नागरिकांना येण्यासाठी शासनाच्या वतीने बसची व्यवस्था केली होती.

समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी सात वाजताच कार्यकर्त्यांसह विजयस्तंभस्थळी भेट देऊन अभिवादन केले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेना तसेच भारतीय बौद्ध महासभेचे भीमराज आंबेडकर, मीराताई आंबेडकर यांनी अभिवादन करून सभा घेतल्या. या वेळी समता सैनिक दलाचे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. अभिवादनासाठी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, खासदार अमर साबळे, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी विजयस्तंभस्थळी भेट देऊन अभिवादन केले. श्री क्षेत्र वढू येथेही दिवसभर अभिवादन कार्यक्रम शांततेत सुरू होता. श्री क्षेत्र तुळापूर येथेही अनेकांनी भेट दिली.

त्यांना अद्याप नोटिसा नाहीतः प्रकाश आंबेडकर
दंगलीनंतर स्थानिक ग्रामस्थांची शांततेची ग्वाही, त्यांचा मान सरकारने राखला नाही. ज्यांनी समन्वयाची भूमिका घेतली, त्यांनाच सरकारने नोटिसा पाठविल्या. मात्र, ज्यांनी दंगली घडविल्या, त्या संभाजी भिडेसारख्या नेत्यांना सरकारने अद्याप नोटिसा दिलेली नाही.

विजयस्तंभ परिसरासाठी १०० कोटींची मागणीः आठवले
विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही आनंदाची बाब आहे. पोलिस व प्रशासनानेही उत्तम व्यवस्था केल्यामुळे १० ते १५ लाखांचा जनसमुदाय येऊनही कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र, येत्या काळात या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व त्यासाठी १०० कोटींची मागणी केली आहे. त्यातील ६३ कोटी रुपये मंजुरीची प्रक्रिया झाल्यात जमा असून, विजयस्तंभ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीव निधीसाठी राज्य सरकारच्या शिफारशीने केंद्राकडे आग्रही मागणी करणार आहे.’

संविधान संरक्षणासाठी लढणारः आझाद

पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी उशिरा आपल्या कार्यकर्त्यांसह विजयस्तंभस्थळी दाखल झाले. या वेळी विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी जाण्यापूर्वी व नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या वेळी कार्यकर्त्यांसमोर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘दलित, मराठा, बहुजन एकसारखे असून, त्यांच्या समन्वयासाठी व संविधान संरक्षणासाठी अखेरपर्यंत लढत राहणार आहे. महाराष्ट्रात मनुवादी सरकार मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण करत आहे. सर्व समविचारी घटकांना एकत्र करून सरकार उखडणार आहे. शौर्यभूमी असलेल्या विजयस्तंभस्थळी शेवटच्या श्वासापर्यंत येतच राहणार आहे.’

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या