महागणपती पुढील थाळीतील दान हे ट्रस्टचे उत्पन्न

पुणे, ता. 12 ऑक्टोबर 2019: भाविकांनी देवासमोर अर्पण केलेल्या पैशांमध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीला हक्क सांगता येणार नाही. देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीतील उत्पन्न हे मंदिराच्या ट्रस्टची मिळकत आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला. या उत्पन्नाचा विनियोग देवस्थान आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास ट्रस्टचे विश्‍वस्त जबाबदार आहेत, असे निकालात म्हटले आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती येथील पुजारी प्रसाद आणि मकरंद कुलकर्णी यांनी श्री महागणपतीसमोर थाळीमध्ये अर्पण केलेली रक्कम पूर्णत: त्यांना घेण्याचा हक्क आहे, असे घोषित करावे, असा दावा दिवाणी न्यायालयात दाखल केला होता.

देवासमोरील थाळीतील उत्पन्न कोणी घ्यावे, याबाबत वाद उत्पन्न झाला होता. शिरूरच्या तहसीलदारांच्या मध्यस्थीने गाभाऱ्यासमोर स्वतंत्र गुप्तदान पेटी ठेवण्यात आली. या पेटीतील उत्पन्न स्वतंत्र बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. हे सर्व उत्पन्न पुजारी म्हणून वैयक्तिकरीत्या घेण्याचा हक्क आपला आहे, असा दावा कुलकर्णी यांनी केला होता. दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत ही रक्कम घेण्यास देवस्थान ट्रस्टने हरकत करू नये, अशी अंतरिम मनाई मागितली होती. दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत ट्रस्टने पुजाऱ्यांना दरमहा 25 हजार रुपये द्यावेत. तसेच गुप्तदान पेटीतील देणगी रकमेचा वापर करण्यास दिवाणी न्यायालयाने ट्रस्टला मनाई केली होती.

या निकालाविरुद्ध कुलकर्णी यांनी पुणे जिल्हा न्यायालयात अपील केले होते. तर भाविकांनी अर्पण केलेली दानपेटीतील रक्कम ही ट्रस्टची मिळकत आहे. त्यावर कोणीही वैयक्तिक हक्क सांगू शकत नाही, यासाठी देवस्थानने ट्रस्टचे वकील ऍड. शिवराज कदम जहागिरदार यांच्यामार्फत या निकालाला आव्हान दिले होते.

पुजाऱ्यांतर्फे, ग्रामजोशी म्हणून त्यांना मिळालेल्या तत्कालीन इंग्रज सरकारच्या सनदेनुसार वतन जमिनी व देवाचे पुजारी म्हणून हे सारे उत्पन्न घेण्याचा हक्क असल्याचा युक्तिवाद केला. तर देवस्थान ट्रस्टतर्फे ऍड. जहागिरदार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत देवापुढे अर्पित दान ही संबंधित देवस्थान ट्रस्टची मिळकत आहे. त्यावर कोणीही वैयक्तिक हक्क सांगू शकत नसल्याचे जिल्हा न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या