शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी: वळसे पाटील

Image may contain: 20 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 25 जानेवारी 2019 ः कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी केले.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जय किसान कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अशोक पवार, पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे हे माजी आमदार, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, उपसभापती जयमाला जकाते, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे, जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल व राजेंद्र जगदाळे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण उपस्थित होते.

भाजप सरकारच्या काळामध्ये कांद्याला बाजार भाव नाही, डाळिंबाला बाजार भाव नाही, दुधाला बाजार भाव नाही, साखरेचे भाव पडले आहेत, यामुळे सर्व बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे. भाजपसरकार स्वामीनाथन आयोग लागू केल्याचे सांगत आहे. परंतु याची कुठेच अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी करून भाजप सरकारच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला आहे. घोषणाबाज सरकारला आगामी निवडणुकीत शेतकरी व सर्व समाज मतपेटीतून जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असे अशोक पवार यांनी सांगितले.

पोपटराव गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी स्वागत केले. उपसभापती विश्‍वास ढमढेरे यांनी प्रास्ताविक केले. संचालक आबाराजे मांढरे यांनी आभार मानले.

रयत शाळेच्या मैदानावर भरलेल्या या कृषी प्रदर्शनात, बी-बियाण्यांच्या बदलत्या जाती, सेंद्रिय व रासायनिक खतांचे विविध प्रकार, अत्याधुनिक कृषी औजारे, सुधारित पशुखाद्य, अद्ययावत ड्रीप, अन्नप्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय कृषी उत्पादने व विविध प्रकारचे सुमारे दीडशे स्टॉल आहेत. मोटारी व ट्रॅक्‍टर आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वाहनांचे स्वतंत्र दालन आहे. खाद्य जत्रा विभागात विविध गावरान पदार्थांची रेलचेल आहे. मंगळवारपर्यंत (ता. 29) सकाळी साडेनऊ ते रात्री आठ वेळेत हे प्रदर्शन पाहण्यास खुले राहील, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले व प्रदर्शनाचे संयोजक सचिन तोडकर यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या