अन् बैलगाड्यांसह बैलांना घेऊन आयोजक पळाले...

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor
सणसवाडी, ता. 2 फेब्रुवारी 2019: राज्यामध्ये बैलगाड्या शर्यतींना बंदी असतानाही शर्यत सुरू होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल होत असताना बैलगाडांसह बैलांना घेऊन आयोजकांना पळावे लागले.

बैलगाडा घाटात बुधवारी (ता. 30) सकाळी साडेसातलाच बैलगाडा शर्यती भरविणाऱ्या सणसवाडीकरांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 30) सकाळी साडेसातच्या सुमारास सणसवाडी (ता. शिरूर) येथील नरेश्‍वर मंदिराजवळील बैलगाडा शर्यती घाटात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाच्या पुणे नियंत्रण कक्षातून शिक्रापूर पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार फौजदार शिवशांत खोसे यांच्या पथकातील बीट अंमलदार दत्ता शिंदे, बीट मार्शल अमित देशमुख व इतर पोलिस पथक सकाळी आठ वाजताच घाटात पोचले. या वेळी समोर बैलगाडा शर्यती सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी या सर्व आयोजकांना शर्यतीसाठी प्रतिबंध करून शर्यती बंद पाडताच बैल व बैलगाडे घेऊन सर्वजण घाटातून पळून गेले. यानंतर पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार सणसवाडीतील शरद पठाणराव दरेकर, लक्ष्मण सोपान दरेकर, काळूराम दरेकर व इतरांनी बैलगाडा शर्यत समिती स्थापन करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. याशिवाय या स्पर्धा आयोजनात संभाजी काळे यांनी शर्यतीच्या ठिकाणी स्पीकर व बैठक व्यवस्था करून या स्पर्धेला प्रोत्साहन दिले. याच कारणावरून वरील तिघांवर प्राण्यांना निर्दयी वागविण्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतींना पूर्ण बंदी आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत यात्रा हंगाम वा वैयक्तिक बैलगाडा शर्यती भरविण्याचा कुणी प्रयत्न केल्यास आयोजक व आयोजकांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या