Pulwama terror attack: 40 जवान हुतात्मा

Image may contain: one or more people, people standing and outdoor
श्रीनगर, ता. 15 फेब्रुवारी 2019: जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने गुरुवारी (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे दुपारी सव्वातीन वाजता झालेल्या या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत.

सुमारे १०० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकवून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, बदला घेण्याची मागणी देशवासीय करू लागले आहेत. ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

जम्मू-श्रीनगर हमरस्त्यावर हा भयानक हल्ला झाला. रजा संपवून कर्तव्यावर परतत असलेल्या जवानांसह ७८ वाहनांमधून सुमारे २५०० जणांचा ताफा काश्‍मीर खोऱ्याकडे निघाला असताना, हा प्रकार घडला. ‘जैशे महंमद’मध्ये गेल्या वर्षी दाखल झालेला आदिल अहमद दार हा या आत्मघातकी हल्ल्याचा सूत्रधार असून, तो पुलवामा जिल्ह्यातील काकापुराचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरपासून २० किलोमीटरवर आहे. स्फोटाच्या दणक्‍यामुळे जवानांच्या बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. बसमधील काही जवान तत्काळ तर काही रुग्णालयात उपचारादरम्यान, असे एकूण सर्व ३९ जवान हुतात्मा झाले.

अन्य अनेक बसचेही नुकसान झाले. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर गोळीबारही केला. जखमींमधील काही जवानांची प्रकृती गंभीर असून, त्यांना लष्कराच्या श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘सीआरपीएफ’चा ताफा जम्मूहून पहाटे साडेतीन वाजता निघाला होता आणि सूर्यास्तापर्यंत तो श्रीनगरमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. खराब हवामान व अन्य प्रशासकीय कारणांमुळे जम्मू-श्रीनगर हमरस्ता गेले दोन दिवस बंद होता. त्यामुळे आज निघालेल्या ताफ्यातील जवानांची संख्या जास्त होती. नेहमी एका ताफ्यातून सुमारे एक हजार जवान जातात; पण दोन दिवस हमरस्ता बंद असल्यामुळे आज निघालेल्या ताफ्यात २,५४७ जवान होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ताफ्याच्या पुढे रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करणारे, तसेच चिलखती वाहनही होते. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बसमधील जवान ‘सीआरपीएफ’च्या ७६ व्या बटालियनचे होते. या बसमध्ये या बटालियनचे ३९ जवान होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरा मोठा हल्ला
उरीमधील लष्करी तळावर सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा आज झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. उरीतील ब्रिगेड तळावर चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे १९ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले होते.

असा झाला हल्ला
  •     पहाटे ३.३० वा. जवानांच्या वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला.
  •  श्रीनगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असताना अवंतीपुरा येथे ‘जैशे महंमद’च्या दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदत ताफ्यातील एका वाहनावर आपली गाडी धडकवली.
  • ताफ्यातील वाहनामध्ये ३९ जवान होते. स्फोटामुळे वाहनाचे तुकडे शंभर मीटरपर्यंत फेकले गेले. ताफ्यातील इतर वाहनांचेही नुकसान झाले.
  •  काही गाड्यांवर गोळ्यांच्याही खुणा. लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केल्याची शक्‍यता.
  • दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके कशी आणि सुरक्षा यंत्रणा कशी भेदली, याचा तपास सुरू.
पण पुढे काय?
उरीनंतर पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याचा पायंडा पाडला आहे. हल्ल्यामागे ‘जैशे महंमद’ ही दहशतवादी संघटना आहे. ती पाकिस्तानमधून कारवाया करते, हे तर जगजाहीर आहे. हे सगळे लक्षात घेता उरीनंतर पुन्हा दुसरा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणार का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचे समाधानकारक उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण असा हल्ला कोणताही उतावीळपणा न करता, अत्यंत थंड डोक्‍याने, आपण निवडलेल्या जागी, आपण निवडलेल्या वेळी आणि आपण ठरविलेल्या संख्येत केला पाहिजे. त्यातील सर्वांत अग्रगण्य घटक म्हणजे ‘तो हल्ला यशस्वी होईल’, याबद्दल तसूभरही संशय असता कामा नये. याला बराच वेळ लागू शकेल; परंतु या भ्याड क्रूरतेचे फळ ‘जैशे महंमद’ आणि परभारे पाकिस्तानला भोगावे लागेल, याची बरीच शाश्‍वती आता वाटायला हरकत नाही. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या