रांजणगाव पोलिसांचा जाणीवपूर्वक कानाडोळा? (Video)

Image may contain: 3 people, people sitting
रांजणगाव गणपती, ता. 15 फेब्रुवारी 2019 (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव गणपती येथे अनेक कामगार स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. परंतु दर महिन्याचा पगार झाल्यावर हे कामगार ऑनलाइन लॉटरीच्या तसेच दारुच्या नादी लागून हे पैसे उधळत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. रांजणगाव पोलिस या अवैध लॉटरी व्यवसायाकडे तसेच दारु धंद्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा का..?  करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अंदाजे ५०० कंपन्या आहेत. या कंपन्यात काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातुन कामगार आपल्या कुटुंबासहीत येत असतात. रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी येथे मोठया प्रमाणात हे कामगार वास्तव्यास आहेत. कंपनीत ८ तास, १२ तास काम करुन येईल त्या पगारातून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत असताना झटपट पैसा मिळवण्याच्या उद्देशाने हेच कामगार ऑनलाइन लॉटरीच्या आहारी गेले असून या लॉटरीच्या नादापाई त्यांचे प्रचंड मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाईन लॉटरी व्यवसाय हा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे येथुन कामाला येणाऱ्या जाणाऱ्या महिला, मुली, शाळेतील विद्यार्थीनी यांची मोठया प्रमाणात कुचंबणा होत आहे.

लॉटरी खेळायला येणारे बरेचसे ग्राहक हे दारु पिऊन आलेले असल्याने अनेकदा महिलांना असुरक्षित वाटते. जाणाऱ्या-येणाऱ्या महिलांकडे बघुन अश्लील हावभाव करणे, छेडछाड करणे या कारणांमुळे महिला व मुली त्रस्त झाल्या आहेत. परंतु, समाज्यात बदनामी होईल या भीतीने कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. कारेगाव येथे औद्योगिक वसाहतीत पोलिस स्टेशनच्या हद्दीत अगदी हाकेच्या अंतरावर हा सगळा प्रकार चालू असुनही पोलिस मात्र "हाताची घडी तोंडावर बोट" अशा अविर्भावात वागत असल्याने पोलिसांचे या लोकांशी काही आर्थिक हितसंबध आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे. या तीनही गावातील काही राजकीय पदाधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या अवैध व्यवसायांना खतपाणी घालुन मदत करत तर करीत नाहीत ना...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या अवैध धंद्यामुळे अनेक कामगारांचे संसार उध्वस्त झाले आहेत. महिन्याचा सगळा पगार या ऑनलाईन लॉटरीत गेल्याने हे कामगार कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या