शिरूरमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी हेल्पलाइन

Image may contain: 1 person, smiling, indoorशिरूर, ता. 25 फेब्रुवारी 2019: शिरूरमधील जमीन गैरव्यवहारासंदर्भात पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अटक झालेल्या शिरूरच्या तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली गरड यांच्या कार्यकाळात जवळपास 400 एकर क्षेत्राचा बेकायदा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला. याप्रकरणी बाधित शेतकऱ्यांसाठी लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिरूर तालुका मनसेचे उपाध्यक्ष तेजस यादव यांनी दिली.

शिरूर तालुक्‍यातील 60 एकर शासकीय जमिनींच्या बेकायदा हस्तांतरण प्रकरणात पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोनशे शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. यात नायब तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह काही दलाल, तलाठी, मंडलाधिकारी व अनेकजण अटकेत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. तालुक्‍यात चासकमान, गुंजवणी व इतर अनेक प्रकल्पग्रस्तांसाठीही जमिनी संपादन होऊन त्यातही असेच अनेक गैरव्यवहार घडले आहेत. या प्रकरणांमध्ये गरीब आणि लहान शेतकरी अनेक असून ते भीतीपोटी आपल्या तक्रारी करण्यासाठी पुढे येत नाहीत. याचसाठी शिरूर तालुक्‍यातील बाधित शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन व तक्रार निवारण कक्षाची मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक आणि शिरूर प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी शिरूरसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यासाठी शिरूर तहसीलदार व पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना एक सूचना पत्र देऊन हेल्पलाइन पुढील आठवड्यात सुरू करणार असल्याची ग्वाही दिल्याची माहिती तेजस यादव यांनी दिली.

नायब तहसीलदार गीतांजली गरड यांना ज्या प्रकरणात अटक झाली आहे, त्याच प्रकरणातील एक तक्रार शिक्रापूर पोलिसांकडे दाखल आहे. त्याचा तपास सुरू असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या