बदला.. भारताने पाकवर फेकले हजार किलोचे बॉम्ब

No photo description available.
नवी दिल्ली, ता. 26 फेब्रुवारी 2019: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली असून, भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही म्हटले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.'

आज (मंगळवार) पहाटे साडेतीन सुमारास लढाऊ विमानातून हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तान हवाई दलाचे प्रवक्ते यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की भारतीय हवाई दलाने एलओसी ओलांडून हल्ला केला. पाकिस्तान प्रत्युत्तर देणार तोपर्यंत विमाने परत गेली होती. 

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने  या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती.
अखेर मंगळवारी भारताने हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या