'स्वराज्य रक्षक संभाजी' सुरू राहणार: डॉ. अमोल कोल्हे

Image may contain: 1 person, closeup
शिरूर, ता. 12 मार्च 2019 : राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतील प्रमुख अभिनेते अमोल कोल्हे मैदानात उतरण्याची शक्‍यता असल्यामुळे तेथील निवडणुकीत रंगत भरली आहे. कोल्हे यांनी निवडणूक लढविल्यास आयोगाकडून निवडणुकीच्या काळात त्यांची ही मालिका सुरू ठेवली जाणार की तिचे प्रक्षेपण तात्पुरते बंद होणार, याबाबत मतदारांबरोबरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही, अशी माहिती अभिनेते व डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.


सोशल मीडिया व विविध ठिकाणांहून मालिकेबाबत बातम्या प्रसारीत होत आहेत, याबाबत सूत्रांकडून नुकतीच आलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणेः
नमस्कार!
आता News Channel वरून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरत आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या बातमीवर विश्वास ठेवू नका हि नम्र विनंती. मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही.
छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील!
धन्यवाद!

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले डॉ. अमोल कोल्हे मालिकांपासून काही काळ दूर राहणार आहेत. 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पूर्ण झाल्यानंतर डॉ. कोल्हे काही काळ विश्रांती घेणार आहेत. वैयक्तिक कारणांमुळे मनोरंजन विश्वातून सुट्टी घेण्याची घोषणा डॉ. कोल्हेंनी केली.

'शिवबंधन' तोडून घडयाळ हाती बांधल्यानंतर ते शिरुर लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. निवडणुकीचा प्रचार आणि संभाजी महाराजांच्या मालिकेचं चित्रीकरण या दोन्ही गोष्टींना सध्या ते वेळ देत आहेत. मात्र ही तारेवरची कसरत करताना अमोल कोल्हेंची दमछाक होत असल्याचं म्हटले जात आहे. निवडणुका आणि मालिकेचं चित्रीकरण असे दुहेरी काम सांभाळताना काहीसा ताण अमोल कोल्हेंना येताना दिसत आहे. त्यामुळेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पूर्ण करुन ते काही काळ मालिकांपासून दूर राहतील.

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीने थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबला. अजित पवारांनी जाहीर मतदान घेऊन खासदारकीच्या उमेदवारीसाठी उपस्थितांची पसंती जाणून घेतली. तेव्हा डॉ. अमोल कोल्हेंना भरघोस प्रतिसाद मिळाला होता. तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी हा निर्णय घेत आहे' असे म्हणत डॉ. अमोल कोल्हेंनी एक मार्चला राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता.

डॉ. अमोल कोल्हेंचा प्रवास
डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधले होते. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. प्रत्यक्षात त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी चालली नाही.

अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोल्हेंनी लिहिलं होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. डॉ. कोल्हे हे शंभूराजेंची भूमिका साकारत आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला
शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सलग तीन वेळा शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले. यंदाही त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. परंतु, आढळराव यांना आव्हान देणारा तगडा उमेदवार पक्षाकडे नाही, त्यामुळे शिवसेनेविरुद्ध तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने खेळी करत अभिनेते अमोल कोल्हे यांना पक्षात प्रवेश दिला आहे.

कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला, त्याचबरोबर शिरूर मतदारसंघात बदल घडविण्यासाठी होऊ शकतो, या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना शिवसेनेतून आपल्याकडे ओढून घेतले. त्यामुळे येथील लढतीची चर्चा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यात सुरू झाली होती. सध्या कोल्हे यांची मालिका एका वाहिनीवर सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाल्यास या मालिकेचा प्रभाव मतदारांवर पडू शकतो, या शक्‍यतेमुळे या मालिकेचे प्रसारण तात्पुरत्या काळासाठी बंद होईल की सुरू राहील, असा प्रश्‍न प्रेक्षकांबरोबरच मतदारांमध्येदेखील चर्चिला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या