रांजणगाव पोलिसांची कारवाई म्हणजे 'वरातीमागून घोडे'

No photo description available.
रांजणगाव गणपती, ता. 13 मार्च 2019: जागतिक महिला दिनी कारेगाव येथील महिलांनी अवैधधंद्यांवर केलेल्या हल्लाबोल कारवाईनंतर खळबळून जागे झालेल्या रांजणगाव पोलिसांची कारवाई म्हणजे 'वरातीमागून घोडे' असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. तरी पण नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिसांनी अवैध दारूधंद्यांवर धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे आठ अवैध धंद्यांवर कारवाई करत बेकायदा दारू विक्रीप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

कारेगाव येथील अवैध दारू विक्रीसंदर्भात जागतिक महिला दिनानिमित्त एकत्र येत येथील महिलांनी या धंद्यांवर हल्लाबोल करत संपूर्ण दारूबंदीची मागणी केली होती. या मागणीला पोलिस प्रशासनानेही आता हातभार लावत परिसरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईत अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्याकडून अकरा हजार किमतीचे देशी, विदेशी मद्य हस्तगत केले आहे. या धडक कारवायांमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईच्या भीतीने अनेकांनी येथून पळ काढला आहे. यापुढील काळातही ही कारवाई सुरूच राहणार असून, अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, त्याचे नावही गुप्त ठेवले जाईल, अवैध धंद्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्यास संबंधितास तातडीने तडीपार केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या