शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीमधील नेत्यांचे मनोमिलन?

No photo description available.
शिरूर, ता. 19 मार्च 2019: शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर राष्ट्रवादीमधील नेत्यांचे व्यासपीठावर मनोमिलन झाले आहे. पण, हे मनोमीलन खरोखरच आहे की केवळ दिखावा आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून विलास लांडे व जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. सोशल मीडियावर भावी खासदार म्हणून मेसेजेस व्हायरल होत होते. पंरतु, पक्षाने जनमत घेऊन डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहिर केली अन् लांडे व बांदल यांच्या तलवारी म्यान झाल्या. दोघांच्या तलवारी म्यान झाल्याने राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी याचा फायदा मतदानावर कितपत होणार यावर तालुक्यात चर्चा आहे.

दरम्यान, लांडे यांनी फ्लेक्‍सच्या माध्यमातून शड्डू ठोकत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आव्हान दिले होते. बांदल यांनी तर हेलिकॉप्टरमधून देवस्थानांवर पुष्पवृष्टी करत लक्ष वेधून घेतले होते. मतदारसंघात संपर्क दौरे काढून त्यांनी "राष्ट्रवादी'च्या जुन्या-नव्या कारभाऱ्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. "अकार्यक्षम खासदाराला सर्वप्रथम मीच उघडे पाडले असून, आता मीच काय आमच्या पक्षातला कुणीही खासदार होऊ शकतो,' अशी गर्जना करीत त्यांनी प्रचार सुरू केला होता. तर, "आजवर आमच्यासारख्यांच्या पाठिंब्यावर तीनदा खासदार झालेल्या आढळराव यांना सामान्य जनतेचे काहीही देणेघेणे राहिलेले नसल्याने जनताच त्यांना जागा दाखवून देईल,' असे म्हणत बांदल यांनी लोकसभेचे रण गाजवायला सुरवात केली होती.

डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीतील "एन्ट्री' आणि अपेक्षेप्रमाणे उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने लांडे व बांदल बिघडले होते. लांडेसमर्थकांनी तर डॉ. कोल्हे यांना पाडण्याचा इशारा दिला होता. पण, दोघेही चाकणच्या सभेत "राष्ट्रवादी'च्या स्टेजवर आले आणि जोरदार भाषणबाजी करत गटतट बाजूला ठेवून कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने निवडूण देण्याचा विडा उचलला आहे. बांदल यांचे घणाघाती भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. खासदारकीच्या वाटा बंद झाल्यानंतर बांदल यांनी आमदारकीकडे मोर्चा वळवला होता. परंतु, शिरूर की आंबेगाव, हा पेच सोडविण्याचा प्रयत्नही या नेत्यानेच केला असल्याची चर्चा आहे. शिरूर मतदारसंघातून "राष्ट्रवादी'च्या उमेदवारीसाठी माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यात रस्सीखेच आहे.

राष्ट्रवादीमधील एकमेकांवर कुरघोडी करणारे व जाहिर विरोधक असणारे नेते एका व्यासपीठावर येऊन गटतट बाजूला ठेवून पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहिर केले आहे. यामुळे पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी खरोखरच या नेत्यांचे मनोमीलन झाले आहे का? यावर नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या