पुणे-नगर रस्त्यावर 'या' वेळेत अवजड वाहनांना बंदी

No photo description available.
शिक्रापूर, ता. 22 मार्च 2019: येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे.

शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा ते कोंढापुरी फाटा आणि शिक्रापूर-चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते चौफुला (वाजेवाडी) या दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार कोरेगाव भीमा ते कोंढापुरी (खंडाळा माथा) आणि चौफुला (वाजेवाडी) ते शिक्रापूर रस्त्यावर सकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पुणे-नगर व शिक्रापूर-चाकण हे मार्ग जात आहे. शिक्रापूर व कोरेगाव भीमा गावात रस्त्यालगत बाजारपेठ असल्याने बाजारासाठी आलेल्या वाहनांमुळे पुणे-नगर रस्ता अरूंद झाला आहे. तुळापूर व थेऊरमार्गे येणारी जड वाहने हे कोरेगाव भीमा वरून नगर रस्त्यावरून चाकणकडे जातात, त्यामुळे चाकण चौकात आणि रांजणगाव एमआयडीसीतून  मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येत-जात असल्याने कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रांजणगाव एमआयडीसी येथे जाणारया कामगारांची संख्या जास्त असल्याने ते शिक्रापूर या भागात रहिवासी आहेत. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांना जाण्या-येण्यास त्रास होतो. रूग्णवाहिकांना गंभीर रूग्ण घेवून जाण्यास अडथळा निर्माण होतो. जड वाहनांमुळे शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात झाले आहेत.

पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2013 ते सन 2018 या 6 वर्षात शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पुणे-नगर रस्त्यावर एकूण 436 अपघात झाले असून, यामध्ये 188 व्यक्तींचा मृत्यू आणि 329 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. शिक्रापूर, जातेगाव, करंदी व कासारी या शिरूर तालुक्यातील ग्रांमपंचायतींच्या सरपंचांनी वरील वेळेत अवजड वाहनांमुळे शालेय विद्यार्थी, नोकरवर्ग यांना नाहक त्रास सहन करावा लागतो व अपघात होतात. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, असे पत्राद्वारे कळविले आहे. नगर बाजूकडून येणारी अवजड वाहने कोंढापुरी (खंडाळामाथा) येथे आणि पुणे बाजूकडून येणारी अवजड वाहने वाहन चालक त्यांचे सोयीनुसार तुळापूर नाका येथे वाहने पार्कींग करतील. रांजणगाव एमआयडीसीतील कामगार व अधिकाऱयांना शिक्रापूरच्या वाहतूक कोंडीमुळे कामावर जाण्यास विलंब होतो परिणामी कारखान्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. स्कूल बसही वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. पुणे-नगर रस्त्याचे चौपदरीकरण किंवा रस्ता दुरूस्ती व साईडपट्यांचे काम पूर्ण होईपर्यंत व पर्यायी रांजणगाव ते चाकण रस्ता होईपर्यंत सदर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱयांना कळविला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी वरील वेळेत पुणे-नगर रस्त्यावर अवजड वाहनांना एक महिन्यासाठी बंदी घालण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकारयांच्या या आदेशाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या