पाचर्णे व आढळरावांच्या 'या'साठी एकमेकांना शुभेच्छा!

Image may contain: 2 people, people smiling, closeup
शिरूर, ता. 22 मार्च 2019: आमदार बाबूराव पाचर्णे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना "चौकार' मारण्यासाठी; तर आढळरावांनी पाचर्णे यांची ही सहावी निवडणूक असल्याने "षटकार' मारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आढळराव व पाचर्णे यांच्या जोडीला तालुक्‍यात "संताजी-धनाजी'ची उपमा दिली जाते. ही जोडी अभेद्य व अखंड राहावी, अशी अपेक्षाही अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 21) येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली. शिवसेनेच्या हटवादीपणामुळेच शिरूर नगर परिषद व पंचायत समिती हातातून गेल्याचा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र, नंतर मनोमीलनही झाले.

खासदार आढळराव पाटील व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी भुजबळ व श्‍यामराव चकोर, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख ऍड. धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाचंगे, सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब बेनके, शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक शेळके, उद्योजक राजेश लांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, पंढरीनाथ गायकवाड, केशव लोखंडे, मितेश गादिया, राजू शेख, विजय नरके, नीलेश नवले आदी या वेळी उपस्थित होते.

बैठकीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर बैठकीतील आरोप-प्रत्यारोपांची माहिती दिली. शिवसेनेने तालुक्‍याच्या राजकारणात स्वबळाचा नारा देत हटवादी भूमिका घेतली. त्यांच्या उमेदवारांमुळे विजयाच्या समीप आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना छोट्या-मोठ्या निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागला. भाजपने कधीही शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला नाही. परंतु, शिवसेनेने भाजपला कमी लेखण्यास एकदाही सोडले नाही. आमदार पाचर्णे यांच्या माध्यमातून तालुक्‍यात विकासकामे करताना खासदारांचा आदराने उल्लेख केला गेला. परंतु, शिवसेनेने कधीही भाजप कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही, अशी तक्रारही कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, या बैठकीतून मनातील मळभ दूर झालेल्या कार्यकर्त्यांनी, "नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने आढळराव यांच्या पाठीशी भाजप कार्यकर्ते ठामपणे उभे राहतील व त्यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करतील,' असा निर्वाळा दिला.

कार्यकर्त्यांनीही झाले गेले विसरून जावे...
राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाल्याने कार्यकर्त्यांनीही झाले गेले विसरून मनोमिलन घडवावे, निवडणुकीत एकजुटीने काम करावे, असे आवाहन आढळराव पाटील व पाचर्णे यांनी केले. पाचर्णे यांनी खासदारांना "चौकार' मारण्यासाठी; तर आढळरावांनी पाचर्णे यांची ही सहावी निवडणूक असल्याने "षटकार' मारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आढळराव व पाचर्णे यांच्या जोडीला तालुक्‍यात "संताजी-धनाजी'ची उपमा दिली जाते. ही जोडी अभेद्य व अखंड राहावी, अशी अपेक्षाही अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या