विद्यार्थ्यांनी बनवली चिमण्यांसाठी घरटी (Video)

विठ्ठलवाडी, ता.२४ मार्च २०१९ (प्रा.एन.बी.मुल्ला)  : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे  पांडुरंग विद्यामंदिरातील बालचमूंनी चिमण्यांच्या उन्हाळ्यात उनापासुन संरक्षणासाठी कृत्रिम  घरटी तयार करून पक्षी संवर्धनाचा संदेश दिला आहे.
विठ्ठलवाडी(ता. शिरूर) येथील उपक्रमशील शाळा श्री पांडुरंग विद्या मंदिर मधील इयत्ता पाचवी व सहावीच्या पक्षीप्रेमी विद्यार्थ्यांनी स्वच्छ सुंदर शाळा विभागाचे प्रमुख प्रवीण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांसाठी घरटी बनविण्याचा उपक्रम राबविला आहे.विद्यालयाच्या परिसरात रखरखत्या उन्हात कासावीस झालेल्या चिमण्यांना मायेची ऊब म्हणून टाकाऊ पासून टिकाऊ प्रकल्पांतर्गत खोक्यापासून अनेक घरटी तयार केली आहेत.

विद्यार्थ्यांनी पक्षांची तहान व भूक भागवण्यासाठी प्रत्येकाने मूठभर धान्य व बाटलीतून पाणी आणले होते. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी शाळेपासूनच सुरुवात करणे गरजेचे असल्याने स्वच्छ सुंदर शाळा प्रकल्पांतर्गत शाळेतील बालचमूंनी चिमण्यांच्या सुरक्षेसाठी कृत्रिम घरे तयार करून शालेय परिसरात लावली आहेत. सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे चिमण्या शाळेच्या इमारतीच्या परिसरात आसऱ्यासाठी घीरट्या घालत असल्याने  विद्यार्थ्यांनी तयार केलेली कृत्रिम घरटी बसवण्यात आली. क्षणाचाही विलंब न लावता या घिरट्या घालणाऱ्या चिमण्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कृत्रिम घरट्यांमध्ये विसावल्या गेल्या हे पाहून विद्यार्थी देखील खूप आनंदी झाले. 

या कृत्रिम घरट्यामुळे  चिमण्यांचा चिवचिवाट वाढला असून विद्यार्थ्यांच्या बरोबर चिऊताईची सुद्धा शाळा भरली की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे पक्षी संवर्धनाचा संदेशही परिसरात देण्यात आला. या उपक्रमाचे मुख्याध्यापक सुरेश थोरात व  शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल  गवारे यांनी कौतुक केले. शालेय परिसरात ठिकठिकाणी पसरट भांड्यामध्ये पाणी साठवून व ठीक ठिकाणी धान्य ठेवून संपूर्ण उन्हाळ्यात चिमण्यांच्या व  पक्षांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी बोलताना उपक्रमशील शिक्षक प्रविण जगताप यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या