'जनतेच्या मनात 'अढळ'स्थान; चौकार मारणारच'

Image may contain: 1 person, eyeglasses and indoor
शिरूर, ता. 25 मार्च 2019: विरोधकांनी माझ्या विजयात कितीही खोडा घालायचा प्रयत्न केला, तरी जनतेच्या मनात माझ्याविषयी असलेले "अढळ' स्थान आजही कायम आहे. त्यामुळे आपण 'चौकार' मारणारच,' असा विश्‍वास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुनाट (ता. शिरूर) येथे व्यक्त केला.

शिवसेना-भाजपच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या गावभेट दौऱ्यानिमित्ताने गुनाट (ता. शिरूर) येथे आयोजित सभेत आढळराव पाटील बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'खासदारकीच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांत मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी गाव तिथे निधी दिला आहे. विरोधकांनी मात्र डोळ्यावर पट्टी बांधत आंधळेपणाची भूमिका घेतल्याने त्यांना ही विक्रमी विकासकामे दिसतच नाहीत. त्यामुळे ते आरोपांचे फुसके बार उडवत आहेत. विरोधकांनी माझ्या विजयात कितीही खोडा घालायचा प्रयत्न केला, तरी जनतेच्या मनात माझ्याविषयी असलेले "अढळ' स्थान आजही कायम आहे. त्यामुळे आपण 'चौकार' मारणारच. 'शिरूर लोकसभा मतदारसंघातून आजवर निवडून आलेल्या खासदारांनी मतदारसंघातील किती गावांना भेटी दिल्या, हा संशोधनाचा विषय आहे. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम असते तर सलग पंधरा वर्षे मला निवडून दिलेच नसते. त्यामुळे विरोधकांनीच आता आत्मचिंतन करावे.''

निष्ठावंतांनाच किंमत नाही, तिथे सर्वसामान्यांना काय?
आमदार बाबूराव पाचर्णे म्हणाले, 'शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला असता, तर निष्ठावंतांना सोडून आयात उमेदवाराला उमेदवारी द्यायची नामुष्की पक्षावर आलीच नसती. ज्यांनी पंचवीस तीस वर्षे पक्षासाठी स्वतःला झोकून दिले; त्याच निष्ठावंतांची भर सभेतून "उमेदवारी द्यायची का?' असा सवाल करत एकप्रकारे टिंगलटवाळीच चालवली आहे. जिथे निष्ठावंतांनाच किंमत नाही, तिथे सर्वसामान्यांना काय किंमत असणार? विरोधकांना आढळराव पाटील यांच्यावर टीका करणे सोपे आहे, मात्र त्यांच्याएवढी विक्रमी कामे करणे व जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे कधीही शक्‍य होणार नाही. कारण, याही निवडणुकीत जनतेचा कौल हा केवळ त्यांच्याच बाजूने आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या