'डॉ. कोल्हे 2 महिन्यांचे पाहुणे; ते 5 वर्षांत करणार'

Image may contain: 2 people, people smiling, beard
शिरूर, ता. 27 मार्च 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे दोन महिन्यांसाठीचे पाहुणे आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी म्हटले आहे तर पंधरा वर्षांत जे झाले नाही, ते पाच वर्षांत करणार, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

..ते पाच वर्षांत करणार: डॉ. अमोल कोल्हे
"शिरूर मतदारसंघात जे पंधरा वर्षे खासदार आहेत, त्यांनी विकासकामे केली असती तर आज माझ्यावर टीका करण्याऐवजी कामांची यादी दाखवता आली असती. मात्र, आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पंधरा वर्षांत जे झाले नाही, ते पाच वर्षांत करणार,'' असे मत शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

चास (ता. खेड) येथे डॉ. कोल्हे यांच्या प्रचारासाठी कोपरा सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "मतदारसंघात भक्ती- शक्ती कॉरिडॉर निर्माण करण्याचा मानस आहे. यातून पर्यटनाचा चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांच्या कलेला वाव देण्यासाठी क्रीडा संकुले तयार करणे, आरोग्याच्या सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य सेवेचा कणा बळकट करणे, वनौषधींवर प्रयोग करणारे उद्योग उभारणे, हे करण्यास प्राधान्य देणार आहे.''

खेड तालुक्‍यासह शिरूर मतदारसंघात अशी अनेक ठिकाणे आहेत, की त्यांचा पर्यटनाबाबतीत विकास केल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल. त्यातून उदरनिर्वाह हा फक्त नोकरीवरच होते, हे समीकरण पुसले जाईल. स्थानिकांच्या रोजगारात वाढ होऊन कंपन्यांमध्ये नोकर होण्याऐवजी ते स्वतः मालक होतील, असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

कोल्हे दोन महिन्यांसाठीचे पाहुणेः राम गावडे
लोकसभेचे स्वप्न पाहून थेट मुंबईतून शिरूरमध्ये दोन महिन्यांसाठी अवतरलेल्या कोल्हेंनी सहा तालुक्‍यांबद्दल बोलणे म्हणजे विनोद आहे. त्यांनी त्यांच्या मूळ गाव नारायणगावसाठी आत्तापर्यंत काय केलेले नाही. त्यामुळे केवळ निवडणुकीपुरते पाहुणे म्हणून आलेल्या कोल्हेंनी आपली राजकीय पात्रता पाहूनच बोलावे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे म्हणाले.

"अमोल कोल्हे, राष्ट्रवादीने केवळ तुमच्या चेहऱ्यावर भाळून आणि पक्षातील अनेकांना अपमानित कर्रून तुम्हाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा बैलगाडा शर्यती, विमानतळ या प्रश्‍नांबद्दल तुमच्या नेत्यांचे कुटिल कर्तुत्व तपासा, मगच बोला. मुळात पक्षातील नेते विलास लांडे आणि देवदत्त निकम यांच्यापेक्षाही तुम्ही उमेदवारीला लायक कसे झालात, तेही आता जाहीर करा,'' असे थेट आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी दिले.

माजी आमदार विलास लांडे आणि देवदत्त निकम यांच्यापेक्षा तुम्ही लायक कसे ठरलात, हे जाहीर करा; म्हणजे तुमची खासदार आढळरावांबद्दल बोलण्याची पात्रता काय ते समजेल. 2005 मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने बैलगाडा शर्यतींना कायद्यात अडकविले, तर पुढे विमानतळाचा अहवाल 2013 मध्ये लपून ठेवला हे पाप तुमच्या नेत्यांना विचारण्याचे आव्हानही गावडे यांनी दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या