बाजारपेठेत पाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी

Image may contain: 4 people, people smiling, people standing, people sitting, motorcycle and foodशिरुर,ता.६ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्‍ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा समजला जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत.

यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी गुढी उभारली जात असल्याने साखरेच्या गाठी, आंब्याची पाने, लिंबाचा पाला, गुढीसाठी बांबू, वस्त्र आणि अन्य साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.शिरुर शहरातील हलवाई चौक,भाजी बाजार,पाचकंदील चौक,सरदार पेठ,आदी परिसरात गुढी पाडव्यानिमित्त परिसर गजबजुन गेला होता.या गुढीपाडव्यात प्रथमच महागाईचा फटका दिसुन येत असुन गुढ्यांच्या किंमती वाढल्या आहेत.गुढीपाडव्यानंतरच हिंदू सणांना सुरुवात होते. चैत्रपालवीचा हा सोहळा गुढी उभारून साजरा केला जातो. नव्या वर्षाचे स्वागत हे याच पद्धतीने करायचे हा नियम परंपरागत आहे. त्यामुळे तो घरोघरी पाळला जातो.पूर्वीच्या काळी उंचच उंच गुढी उभारली जात असे.

त्यातही कोणाची गुढी उंच याची स्पर्धा लागलेली असते. परंतु, अन्य सणांसारखाच यामध्येही आधुनिकतेने शिरकाव केला आहे. वाडा संस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आल्याने गुढ्यांचा साईजही छोटा झाला आहे. त्यामुळे अन्य कोणाला त्रास न होता खिडक्‍यांमधून गुढ्या बाहेर डोकावताना दिसतात.घरातील स्त्री त्यांची एखादी नवी कोरी साडी या गुढीला नेसवत असे. परंतु, आता खणाचेच काठ लावलेले छोटे तयार वस्त्र बाजारपेठांमध्ये दिसू लागले आहे. पारंपरिक पांढऱ्या रंगाशिवाय रंगीबेरंगी गाठीही बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या दिसुन येत आहेत.भरीव गाठींसह पोकळ गोलाकार, “स्टार’आकारासह फुलांच्या आकारातील गाठी बाजारात उठून दिसत आहेत.

गुढीच्या खरेदीबरोबरच मुहूर्ताला नवीन वस्तूची खरेदी अनेक जण हौसेने करतात. यामध्ये फ्रीज, टीव्ही, मायकोव्हेव्ह,नवीन  आदी घरगुती गोष्टी घेण्यासह नवीन गाडी, घर खरेदीकडेही नागरिकांचा कल असतो. नववर्षाच्या स्वागताला गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पाडव्याला या हंगामाच्या पहिल्या आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे घरातील मानाचे स्थान पटकावण्यासाठी फळांचा राजा देखिल बाजारात दाखल झाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या