निवडणुकीत इतिहास घडवावा: डॉ. अमोल कोल्हे

Image may contain: 1 person, smiling, beard and eyeglasses
शिरूर, ता. 17 एप्रिल 2019: सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे राहून निवडणुकीत इतिहास घडवावा, असे आवाहन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी डॉ. कोल्हे यांच्या सभा झाल्या. यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, "स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे व माझ्यावर वैयक्तिक खोटे आरोप करणाऱ्यांना माझ्या पाठीशी उभी राहिलेली जनता मतपेटीतून योग्य उत्तर देईल. जनतेची ही एकजूट मोडायची आता कोणात हिंमत नाही. मात्र, शिरूर मतदारसंघाच्या रखडलेल्या विकासाच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांनी समोरासमोर चर्चेला यावे'


"खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तरुणांना नोकरीचे, शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचे व शेतीमालास हमीभावाचे, जनतेला पुणे-नाशिक बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न दाखवून पंधरा वर्ष झुलवत ठेवले. भूलथापांना कंटाळलेल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने आढळराव यांचा पराभव निश्‍चित आहे,'' असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

डॉ. कोल्हे म्हणाले, "शिरूर मतदारसंघात दहा लाख महिला मतदार आहेत. निवडणुकीपासून अलिप्त राहणाऱ्या माता भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी प्रथमच प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. प्रचार दौरा करताना खासदारांनी फसविल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे. आढळराव यांच्याकडे विकासाचा मुद्दा नसल्याने ते माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. नारायणगाव व खेड घाटातील काम सुरू करण्यासाठी खासदारांनी दहा मार्च रोजी भूमिपूजन करून बनाव केला. विमानतळ घालविणाऱ्या खासदारांना पंधरा वर्षांत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवता आला नाही. खासदारांनी जनतेचा विश्‍वासघात केला आहे. जनता त्यांच्या जुमलेबाजीला आता भुलणार नाही. बेनके व शेरकर यांच्या नेतृत्वाखालील युवा कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हातात घेतल्याने तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळेल.''

वाहतूक कोंडीमुळे दुचाकीवरून प्रवास
हिवरेतर्फे नारायणगाव येथे सकाळी सात वाजता प्रचारफेरी असल्याने डॉ. अमोल कोल्हे पहाटेच हडपसर येथून रवाना झाले होते. मात्र, खेड घाटातील कोंडीत सुमारे तीन तास ते अडकले. अखेर डॉ. कोल्हे खेड घाटातून एका तरुणाच्या दुचाकीवरून प्रचार स्थळी सकाळी पोचले. वाहतूक कोंडीचा डॉ. कोल्हे यांनासुद्धा फटका बसला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या