शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>>

निमगाव म्हाळुंगी येथे क्रीडा स्पर्धा....
निमगाव म्हाळुंगी, ता. 5 डिसेंबर 2019:
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत पंचायत समिती शिरूरतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बीट पातळीवरील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निमगाव म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होणार आहेत. स्पर्धेचे उद्घघाटन शुक्रवारी (ता.6) सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा शुक्रवार व शनिवारी दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक खेळ होणार आहेत. तालुक्‍यातील विविध बीट पातळीवरील स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या शाळांचा सहभाग यामध्ये होणार आहे. यामध्ये तळेगाव ढमढेरे,पाबळ, सरदवाडी, कवठे व न्हावरा या पाच बिटातील विविध शाळा सहभागी होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे व केंद्र प्रमुख रामदास विश्वास यांनी सांगितले.

तळेगावातील ओढ्यात कचऱ्याचे साम्राज्य...
Image may contain: flower, plant and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. 5 डिसेंबर 2019 (आकाश भोरडे): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील मुरळ ओढ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. तसेच तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर हद्दीतील कंपन्यांनी दुषित सांडपाणी याच ओढ्यात सोडल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर  प्रदूषण होत आहे. हेच पाणी पुढे तळेगाव ढमढेरे गावासाठी वरदान ठरलेल्या भैरवनाथनगर येथील वेळ नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात जात असल्याने नागरिकांना वारंवार विविध साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन रोगराईस आमंत्रण मिळत आहे.तसेच औद्योगिक वसाहती व प्रत्येक घरातील सांडपाणी व कचरा ओढ्यामध्ये टाकल्याने परिसरातील शेतीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वेळ नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शिक्रापूर येथील ग्रामपंचायतीस पत्रव्यवहार केला आहे. परंतु, या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे.

शिक्रापूरात महिलांकडून हैद्राबादच्या घटनेचा निषेध
Image may contain: 20 people, people standingशिक्रापूर, ता. 5 डिसेंबर 2019 (एन. बी. मुल्ला): येथील विविध संघटनांच्या महिलांनी एकत्र येत जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने प्रभातफेरी काढून जनजागृती केली. तसेच हैद्राबाद येथील डॉक्टर युवतीवर अत्याचार करून निर्घुण हत्या केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत शिक्रापूर पोलिसांना महिलांनी निवेदनही दिले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे माहेर संस्थेच्या वतीने महिलांनी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने प्रभातफेरी काढत जनजागृती केली. यावेळी माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश दुतोंडे, विजय तवर, पसेनजीत गायकवाड, यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मंगल सासवडे, पल्लवी खामकर, अनामिका चव्हाण, कल्पना ढोकले, सुनिता चौघुले, स्वाती फडतरे आदीसह महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.  हैद्राबाद येथील युवतीवर अत्याचार करून निर्घुण हत्या केल्याच्या घटनेचा काळ्या फीत लावून महिलांनी निषेध व्यक्त करत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद व शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना निवेदन दिले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यातून युवक बचावला
खंडाळे, ता. 22 नोव्हेंबर 2019:
येथील युवक श्‍यामराव बाळासाहेब नरवडे हे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने अचानक हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत. सुरवातीला कुत्र्यासारखा प्राणी दिसला, परंतु त्याचे अक्राळविक्राळ स्वरूप पाहून नरवडे भयभीत झाले. तेथून त्यांनी पळ काढला. त्यांच्या हाताच्या दंडाला बिबट्याने ओरखडले असून, बिबट्याच्या हल्ल्यातून ते बचावले आहेत.
दरम्यान, खंडाळे, पिंपरी दुमाला, वाघाळे व बुरुंजवाडी परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्या दिसत आहे. बुरुंजवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. परंतु, अलीकडे येथील चारही गावात बिबट्याचा वावर वाढला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. परिसराची पाहणी करून आणखी पिंजऱ्यांची व्यवस्था वनविभागाने करावी, अशी मागणी पाचुंदकर यांनी केली आहे.
Video: अन् त्यांची झाली पुन्हा आईशी भेट...
Video: इनामगावमध्ये बिबट्या घरातच शिरला अन्...

मारुती वाळूंज यांचे वृद्धपकाळाने निधन
शिंदोडी, ता. 14 नोव्हेंबर 2019:
शिंदोडी (ता. शिरूर) येथील जेष्ठ नागरिक मारुती काशिनाथ वाळूंज (वय १००) यांचे वृद्धपकाळाने बुधवारी रात्री निधन झाले. शिंदोडीचे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ (आबा) वाळूंज यांचे ते वडील होते.

तुळशीच्या लग्नाने काकड आरतीची सांगता...
सादलगाव, 13 नोव्हेंबर 2019, (संपत कारकूड):
कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा अशी एक महिना पहाटे साडेचार ते सात काकड आरतीची सांगता झाली. तुळशीचे आणि विष्णू यांचे लग्न लावून हा सोहळा सादलगाव येथील पांडुरंग मंदिरात पार पडला. रोज पहाटे हरिनामाचा गजर, काकड्याचे अभंग, गवळणी आणि पाळणे गायिले जात होते. पहाटेचे हे मंत्रमुगद्य करणारे सूर गावची सकाळ सुरु करीत होते. मंगळवारी काकड आरतीचे ते सूर थांबले. गावोगावी मंहिनाभर नित्यनियम काकड आरती होत असते. शाळकरी मुले, जेष्ठ नागरिक, गावातील महिला पुरुष मंडळी यामध्ये मोठया प्रमाणात सहभागी झाली होते. देवळासमोरील रांगोळी, रोज वाटला जाणारा महाप्रसाद हे काकड आरतीचे खास वैशिष्ट होते. शेवटी काल्याचा महाप्रसाद गावातील वामन रामभाऊ जाधव, सुरेश बापूराव शिंदे यांनी केला.

संभाजीराजे विद्यालयात साकारला इको-फ्रेंडली 'बाप्पा'
Image may contain: foodजातेगाव बुद्रुक, ता. 10 सप्टेंबर 2019 (एन. बी. मुल्ला): येथील संभाजीराजे विद्यालयात १४ हजार ५०० बियांचा वापर करून बनविलेली बाप्पांच्या मोहक मूर्तीमुळे यंदाचा गणेशोत्सव हा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे प्रमुख साधन ठरले आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन नजरेसमोर ठेवत, विद्यालयातील प्राध्यापक विजय वरपे यांनी आंबा, चिंच, जांभूळ, नारळ, सुबाभुळ, लिंब, अशोक, बेहडा आदी निसर्गातील बियांचा वापर करून इको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केली आहे. याबाबतची संकल्पना स्पष्ट करताना प्राचार्य थिटे म्हणाले की, अशा प्रकारे तयार केलेल्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर बिया मूर्तीपासून वेगळ्या होऊन नदीच्या प्रवाहात वाहत जातील व  योग्य सखल भागात रुजतील. त्यामुळे नवीन झाडे निर्माण होऊन वृक्ष निर्मिती होईल आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षण व संवर्धन होईल. प्रा. वरपे यांच्या अभिनव प्रकल्पामुळे नदी प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असून या प्रकल्पात कोणतेही पर्यावरणास हानीकारक घटक नाहीत त्यामुळे परिसरातून या इको-फ्रेंडली बाप्पाचे दर्शन घेण्यांस भाविकांची गर्दी होत आहे.

कोंढापुरीत जखमी उदमांजराला जीवदान
कोंढापुरी, ता. 23 ऑगस्ट 2019: येथे विठ्ठलमंदिरा जवळ आढळून आलेल्या जखमी उदमांजराला येथील तरुणांनी जीवदान दिले असून, या उदमांजराला कात्रज येथील प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराच्या जवळ एक उदमांजर जखमी स्थितीत आढळले होते. नागरिकांनी तळेगाव ढमढेरे येथील सर्पमित्र गणेश टिळेकर यांना माहिती दिली असता त्यांनी त्वरित कोंढापुरी या ठिकाणी धाव घेत प्राणिमित्र रामेश्वर ढाकणे यांच्या मदतीने सदर जखमी उदमांजरास ताब्यात घेतले. जखमी उदमांजरास तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, मदतनीस जालिंदर भोसुरे, सचिन कांबळे यांनी जखमी उदमांजरावर प्राथमिक उपचार केले. उदमांजराच्या पायाला विजेचा धक्का लागल्यामुळे जखमी झाला असावा असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी व्यक्त केला. येथील उपचारानंतर या जखमी उदमांजरास कात्रज येथील प्राणि संग्रहालयात पाठविण्यात आले.

स्व. बाळासाहेब खैरे विचार मंचच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
शिक्रापूर, ता. 20 ऑगस्ट 2019: येथील स्व.बाळासाहेब खैरे विचार मंचच्या वतीने सांगली येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. स्व.खैरे विचार मंचच्या ५० कार्यकर्त्यांनी कसबे डिंग्रज (जि. सांगली) या पूरग्रस्त गावात जावून येथील लोकांना किराणा, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहीत खैरे, उद्योजक प्रशांत सासवडे, तेजस राऊत, विजय लोखंडे, दत्तात्रय भुजबळ, अक्षय वाबळे, प्रशांत वाघोले, अमोल भागवत, प्रणव भरणे आदी कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांसाठीची मदत एका ट्रकमध्ये भरून ती कसबे डिंग्रज ग्रामस्थांना प्रत्यक्ष नेऊन दिली व त्यांची आस्थेने विचारपूस केली. योग्यवेळी मिळालेल्या या मदतीने येथील ग्रामस्थ भारावून गेले.

भुजबळ विद्यालयाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
तळेगाव ढमढेरे, ता. 20 ऑगस्ट 2019: येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे. विद्यालयाच्या वतीने २० हजार रुपयांचे शालेय साहित्य कोल्हापूर मधील पूरग्रस्त भागातील  विद्यालयाला हे साहित्य दिले जाणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.

गुजर प्रशालेने जवानांसाठी पाठविल्या २ हजार राख्या
तळेगाव ढमढेरे, ता. 12 ऑगस्ट 2019 (एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील विद्यार्थिनींनी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी २ हजार राख्या व शुभेच्छा पत्रे पाठविली. प्रशालेचे उपप्राचार्य जगदीश राऊतमारे व शिक्षीकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे व विद्यार्थिनींचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते व प्राचार्य माणिक सातकर यांनी कौतुक केले.

शिक्रापूर एसटी स्थानक परीसरात चिखलाचे साम्राज्य
शिक्रापूर, ता. 9 ऑगस्ट 2019: शिक्रापूर एस.टी.स्थानकच्या परीसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, ठिकठिकाणी डबकीही साचली आहेत. शिक्रापूर बस स्थानकासाठी सुमारे अडीच एकराचा आवार आहे. मात्र, राज्य परीवहनाच्या दुर्लक्षामुळे परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी मुलभुत सुविधाही नसल्याने लांब पल्ल्याच्या गाडया बस स्थानकावर न येता पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील चाकण चौकात थांबून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. शिरूरहून पुण्याला जाणाऱया तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱया बस गाडया मात्र एस.टी.स्थानकवर थांबतात. एस.टी.स्थानकच्या आवारात खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून, सध्या पावसाळा असल्याने स्थानकच्या आवारात सर्वत्र डबकी साचली आहेत. संपूर्ण परीसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडथळयांना सामोरे जावे लागत आहे. परीवहन महामंडळाने एस.टी.स्थानक आवाराची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या
Image may contain: 19 people, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. 4 ऑगस्ट 2019 (एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील जि.प.प्राथमिक शाळा नंबर २ मधील मुलींनी सीमेवरील जवानांना राख्या पाठवून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक विठ्ठल जगताप, जालिंदर ढमढेरे, आनंदराव ढमढेरे, भाऊसाहेब गोरडे यांना मुलींनी औक्षण करून राख्या बांधल्या. प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या सैनिकांबद्दल मुलींनी कुतूहलाने खूप प्रश्न विचारले व त्यांना माजी सैनिकांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येत असलेल्या राख्या माजी सैनिकांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी विठ्ठल जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी केले. मीनाक्षी गवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कासारी येथे महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन
कासारी, ता. 3 ऑगस्ट 2019 (आकाश भोरडे): समाजातील महिलांनी छोटासा उद्योग-व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे रहावे या हेतूने महिला सरपंच सुनीताताई भुजबळ यांच्या पुढाकारातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत कासारी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील महिलांना व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण घेता यावे म्हणून मोफत ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ भुजबळ, किरण रासकर, ग्रामविकास अधिकारी श्रीमती ठुबे, श्री. बेंद्रे व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या