एमआयडीसीत इंधन म्हणून लाकडाचा वापर (Video)

रांजणगाव गणपती, ता. 28 एप्रिल 2019 (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सुमारे ४०० कंपन्या असून, यामधील विविध कंपन्यामध्ये बॉयलर पेटवण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात आहे. यामुळे प्रदुषण होत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते अविनाश फलके यांनी सांगितले.

अविनाश फलके यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत स्टायपॅक इंडिया आणि के के नाग या कंपन्यांना बॉयलरसाठी इंधन म्हणून लाकूड वापरायची परवानगी आहे का..? अशी माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाला विचारली होती. दोन्ही कंपन्यांना बॉयलरसाठी इंधन म्हणून लाकूड वापरण्याची परवानगी नसल्याची माहिती अधिकारात उघड झाली. परंतु, प्रत्यक्ष पहाणी केली असता स्टायपॅक कंपनीत इंधनासाठी लाकूड जाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी कंपनीचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, 'आम्ही इंधन म्हणून लाकूड वापरत नसून लाकडाच्या साली वापरत आहोत.'

के के नाग कंपनीचे एचआर विभागातील श्री. वीर यांनी पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. बॉयलरच्या इंधनासाठी लाकूड वापरत असून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमाच्या आधारेच इंधन म्हणून लाकुड वापरत असल्याचे सांगितले. परंतु, पत्रकारांना बॉयलरच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. शिवाय, कंपनी पत्रकारांना कोणतीच माहिती देण्यास बांधील नसून, आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास बांधील असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या