निघोज,ता.६ मे २०१९ (प्रतिनीधी) : आंतरजातीय विवाह केल्याच्या वादातुन मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.यात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जावयावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.नगरमध्ये पुन्हा 'सैराट' चित्रपटातील कथेची पुनरावृत्ती झाली आहे.
रुक्मिणी रणसिंग असं मुलीचं नावं असून जावयाचं नाव मंगेश रणसिंग आहे. मंगेश आणि रुक्मिणी यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. पण हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या माहेरच्यांनी रागातून रुक्मिणीला तिच्या पतीसह अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं.
पारनेर तालुक्यातील निघोज इथे ही घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत.
लग्नानंतर सहा महिन्यांनी मुलगी माहेरी राहायला आली होती. तिचा नवरा भेटण्यासाठी तिथे आला होता. मात्र यावेळी मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी मंगेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुक्मिणी त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली असता, तिघांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. दोघांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला तर जावयावर उपचार सुरु आहेत.