शिरूर पोलिसांनी फक्त 'एसटी'लाच कशासाठी घातली बंदी?

शिरुर, ता. ७ मे २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर शहरातून जाणा-या पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसेस ला एकेरी मार्ग केल्याने एसटी महामंडळाच्या नुकसानीबरोबरच एसटी मध्ये पुणे (शिवाजीनगर) वरुन शिरुर येथे प्रवाशांना एसटी मध्ये वाहक नकार देत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शिरुर शहरात केलेला एकेरी मार्ग त्वरीत मार्ग बंद करुन वाहतूक पुर्ववत करावी, अशी मागणी शिरुर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक मुजफ्फर कुरेशी यांनी केली आहे.

याबाबत सांगताना मुजफ्फर कुरेशी म्हणाले कि, शिरुर शहरातून  जाणा-या पुणे नगर रस्त्यावर एसटी बसस्थानक आहे. या बसस्थानकात दररोज पुणे-नगर व लांबपल्ल्याच्या शेकडो गाड्या ये-जा करत असतात. शहरात लागणा-या वेड्या-वाकड्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नित्याचाच बनला होता. माञ, त्याला पर्याय म्हणून शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने नगरकडे जाणा-या एसटी बसेसला बंदी घालून ती वाहतूक पुणेच्या दिशेने वळवून शहरात एकेरी मार्ग करत वळविलेल्या बसेस नगरकडे जातील अशी वाहतुक व्यवस्था केली आहे. माञ, या रस्त्यावर कंपनीच्या बसेस, ट्रक या वाहतूक करतच आहेत. त्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी हि एकेरी वाहतुक केली तो उद्देश माञ सफल होताना दिसत नाही.

याचा उलटा परिणाम एसटी महामंडळावर झाला असून पुणे (शिवाजीनगर) येथून शिरुर कडे येणा-या एसटी बस मध्ये प्रवासी घेण्याचे प्रमाण कमी झाले असुन पुणे (शिवाजीनगर) आगारातच एसटी वाहक हे प्रवाशांना, आम्हांला शिरुर शहरातुन उलटे फिरुन जावा लागत आहे. त्यामुळे आम्ही शहरातून जाणार नसुन तुम्हांला बायपास ला सोडू असे म्हणत शहरातील प्रवाशांना बस मध्ये घेण्यास नकार लागत आहे. शिरुर शहराच्या बाहेरुन जाणा-या पुणे नगर महामार्ग बाह्यवळणावर प्रवाशांना सोडल्यानंतर त्यांना शहरात येण्यासाठी रिक्षाला जादाचे पैसे देउन यावे लागत असल्याने तो भुर्दंड व वरती मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शिरुर शहर हि मोठी बाजारपेठ असून शिरुर, पारनेर, श्रीगोंदा या तीन तालुक्यातील शेकडो प्रवासी, आबालवृद्ध, शाळकरी मुले-मुली, युवती ये-जा करतात. त्यामुळे पुर्वी शहरातुन जाणा-या रस्त्यांवरुन एसटी धावत होती त्यावेळेस  नाका नं १ व जोशी वाडी आदी ठिकाणी एसटी हि प्रवाशी घेण्यासाठी थांबत होती. यात आबालवृद्ध, अपंग व विद्यार्थ्यांची सोय होत होती. माञ, एकेरी वाहतूक केल्याने या ठिकाणच्या नागरिकांना एसटी मध्ये बसण्यासाठी एसटी बसस्थानकातच यावे लागत आहे. यामुळे अपंग व वृद्धांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. शिरुर शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुक खोळंबा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने केलेला एकेरी रस्ता हा फायद्याचा ठरण्याचा ऐवजी गैरसोयीचा ठरला आहे. एसटी बरोबरच कंपन्या बसेस, खासगी वाहने, अवजड वाहने यांच्यावरही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी मुजफ्फर कुरेशी यांनी केली आहे.

याबाबत शिरुर बसस्थानकाचे आगारव्यवस्थापक महेंद्र माघाडे यांनी सांगितले, शिरुर शहरात दररोज २५० येणा-या व २५० जाणा-या बसेस च्या फे-या होत आहेत. या निर्णयाचा फटका एसटी महामंडळास बसला असून एसटीचे उत्पन्न घटत चालले आहे. उत्पन्न घटण्याबरोबरच प्रवाशांची काळजी घेणे महत्वाचे असून, प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेउन याबाबत पोलीस प्रशासनाशी लवकरात लवकर सविस्तर चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे माघाडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या