टाकळी भीमा येथे चालक व वाहकाचा सत्कार करून एसटीचे स्वागत

टाकळी भीमा, ता. 10 मे 2019 (एन. बी. मुल्ला): येथे हंगेवाडी- टाकळी भीमा- शिवाजीनगर एसटी बस सेवा नव्याने सुरू करण्यात आली आहे. गावात एसटी आल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने परिवहन मंडळाचे चालक आणि वाहक यांचा सन्मान करण्यात आला.
टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती. ग्रामीण भागातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागाने मार्ग बदलून नव्याने टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, धानोरे, डिंग्रजवाडी या मार्गाने एस टी बससेवा सुरू केली आहे. या एसटी सुविधेचा टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, नवीन गावठाण, भोसे, शेरी, धानोरे, डिग्रजवाडी व कोरेगाव या गावातील प्रवाशांना लाभ होणार आहे.
ग्रामस्थांनी गावामध्ये एसटीचे स्वागत व पूजन करून वाहक आणि चालकाचा पोलीस पाटील प्रकाश कर्पे यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे, माजी चेअरमन दशरथ वडघुले, माजी उपसरपंच बाळासाहेब दोरगे, संचालक मनोज वडघुले, महेंद्र वडघुले, बजरंग वडघुले, संजय कामठे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे, सुरेश काळभोर, राजेंद्र कामठे, तुषार जाधव, हरिदास साकोरे, विश्वास साकोरे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.