बेकायदा रेशन धान्य विकणाऱ्या महिलेवर गुन्हा

तळेगाव ढमढेरे, ता. 14 मे 2019: तळेगाव ढमढेरे येथे पुरवठा विभागाचा परवाना नसताना रेशनिंगच्या तांदळाचा बेकायदा साठा करून तो तांदूळ विक्री केली जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून शिरूर तहसीलदार कार्यालयातील पथकाने त्या ठिकाणी छापा टाकत घरातून ३४ तांदळाच्या गोण्यांसह सुमारे १ हजार ७०० किलो तांदूळ एका खोलीत सील करून सदर दुकानदार महिलेवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार (ता. १०) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील एका घरामध्ये रेशनिंगचे धान्य विक्री होत असल्याची माहिती शिरूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे विश्वास डाळिंबकर, मंडलाधिकारी उद्धव फुंदे, तलाठी ज्ञानदेव वाळके, कोतवाल भरत मोडक यांनी दोन पंचासह सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी सरकारी रेशनच्या तांदळाच्या ३४ गोणी असल्याचे आढळून आल्या. प्रत्येक गोणीत ४५ ते ५० किलो तांदूळ असा सुमारे १ हजार ७०० किलो बेकायदा तांदूळ साठविला असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले. घरातील संबंधित महिला रुपाली धनंजय बामणे यांना त्या सरकारी रेशनच्या तांदळाबाबत विचारले असता त्या महिलेने काही माहिती सांगितली नाही. मात्र, ही महिला आठवडे बाजारातून धान्य विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समजले. त्यानंतर सदर तहसील विभागातील पथकाने दुकानात आढळून आलेल्या सरकारी रेशनच्या तांदळाच्या ३४ गोणी घरातील एका खोलीत ठेवून पंचनामा करून सदर खोली सील केली आहे.

या कारवाईचा अहवाल शिरूर तहसील कार्यालयात सादर करून शिरूरचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार शिरूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे विश्वास माधवराव डाळिंबकर (वय ४७ वर्षे, रा. शिक्रापूर, करंजेनगर २, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी घरातील सरकारी रेशनचे धान्य विक्री करणारी महिला रुपाली धनंजय बामणे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर व अविनाश पठारे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या