खंडाळे येथील खूनाची ओळख पटली; दोघांना अटक

खंडाळे, ता. 15 मे 2019: येथील विहिरीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी 24 तासातच याप्रकरणाचा छडा लावला आहे.

खंडाळे येथील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकणी अटक करण्यात आलेल्या दोघांनी खूनाची कबुली दिली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे येथील एका शेतकऱयाच्या विहिरीत पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला होता. तीक्ष्ण हत्याराने व जबर मारहाण करून खून करण्यात आला होता. या अनोळखी मृतदेहाबाबत तक्रार दाखल केली होती. परंतु, मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर तो मृतदेह गणेश पाडेकर या शेतमजुराचा असल्याचे समजले.

पोलिसांनी पुढील तपासास सुरवात केल्यानंतर गोरख भीमाजी थोरात (रा. वाघाळे) व विजय अरुण नारखेडे (रा. खंडाळे) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी गणेश पाडेकर यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याचे सांगितले. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव व पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने 24 तासातच खूनाचा छडा लावत दोघांना अटक केली.

कोणत्या कारणामुळे खून?
गणेश पाडेकर यांचा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला. यावरून परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी 24 तासात दोघांना अटक केल्यामुळे पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या