शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय

Image may contain: 1 person, beard
शिरूर, ता. 24 मे 2019: शिरूर मतदारसंघातून चौकार मारण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांना यश मिळाले. शिवसेनेच्या पंधरा वर्षांच्या अभेद्य गडाला सुरुंग लावून डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांच्यावर ५८ हजार ४८३ मतांनी विजय मिळवला. एकूण १२ लाख ९२ हजार ४७६ मतांची मोजणी झाली. त्यातील ६ लाख ३५ हजार ८३० मते डॉ. कोल्हे यांना, तर ५ लाख ७७ हजार ३४७ मते आढळराव यांना मिळाली. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना ३८ हजार ५७ इतकी मते मिळाली.

शिरूर मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये गुरुवारी (ता. 23) सकाळी आठ वाजता सुरू झाली. सायंकाळी साडेचार वाजता मतमोजणीच्या २७ फेऱ्या संपल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. कोल्हे यांनी ५८ हजार ४८३ मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. सुरुवातीला टपालाद्वारे आलेल्या मतांची मतमोजणी करण्यात आली. त्यात डॉ. कोल्हे यांना १ हजार २७६ तर आढळराव यांना १ हजार ३४५ मते मिळाली. डॉ. कोल्हे यांनी पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवली. मधल्या पाचव्या ते सातव्या फेऱ्यांमध्ये डॉ. कोल्हे यांची २० हजारांच्या मतांची आघाडी कमी होऊन ती आठ ते नऊ हजार मतांवर आली होती.

आठव्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी पुन्हा मुसंडी मारत वीस हजार मतांची आघाडी कायम ठेवली. चौदाव्या फेरीपासून मतांची आघाडी वाढत गेली. अंतिम फेरीत डॉ. कोल्हे यांनी ५८ हजार ४८३ मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. शिवाजीराव आढळराव गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. शिरूर हा मतदारसंघ होण्याच्या आधी या मतदारसंघाचे नाव खेड होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. नंतर मतदारसंघ पुनर्रचनेत खेड मतदारसंघाचे नाव बदलून शिरूर झाले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आणि २०१४ मध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव करून खासदार आढळराव यांनी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. यावेळी डॉ. कोल्हे यांच्या रूपाने आढळराव यांना तगडे आव्हान उभे राहिले. सुरुवातीपासूनच शिरूर मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झाली होती. शेवटी अभिनेता ते नेता बनून डॉ. कोल्हे यांनी विजयी पताका खांद्यावर घेतली. डॉ. कोल्हे प्रथमच संसदेत जाणार आहेत.

आढळराव यांना डॉ. कोल्हे यांनी रोखले
चौकार ठोकून लोकसभेमध्ये प्रवेश करण्याचा शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वारू राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात असलेल्या प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी रोखला. तीनदा खासदार असल्याने प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका आढळराव यांना बसला. खेड येथील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) रद्द झाले, चाकण येथील  विमानतळ पुरंदरला गेले आणि बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना न्याय मिळवून देण्यात आलेले अपयश त्यांना भोवले. दूरचित्रवाणी मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांनी घराघरांत पोहोचलेल्या कोल्हे यांची राजकीयदृष्टय़ा पाटी कोरी होती. आजी-माजी शिवसैनिकांमध्ये झालेल्या या लढतीला जातीय उल्लेखाचे गालबोट लागले. त्यामुळे चौथ्या विजयासह केंद्रामध्ये मंत्रिपदी विराजमान होण्याची आढळराव यांची मनीषा अपुरी राहिली.

विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना...
आशीर्वाद, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, अजित पवार, देवदत्त निकम, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी केलेले उत्तम नियोजन तसेच पंचायत समिती, महापालिका, जिल्हा परिषद, ग्राम पंचायतीमधील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी झटून केलेले काम तसेच तरुणांची मिळालेली साथ यामुळे विजय मिळाला. जनतेने निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळे त्यांच्यासह सर्व सामान्य कार्यकर्त्यांना विजयाचे श्रेय जाते.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या