लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर दाखवणार इंगा

मुंबई : शिरूर तालुक्यातील लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी 'बिग बॉस'मध्ये प्रवेश केला असून, त्यांनी एन्ट्रीलाच आपण इंगा दाखवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे सुरेखा पुणेकर पहिल्या दिवशीच चर्चेत आल्या आहेत. लावणीचे फड गाजवल्यानंतर ही लावण्यवती आता बिग बॉसचा फड गाजवायला सज्ज झाली आहे.

'बिग बॉस मराठी'चा दुसरा सिझन दिमाखात सुरु झाला आहे. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी 15 स्पर्धकांना 'बिग बॉस'च्या घरात कुलूपबंद केले आहे. सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले या संभाव्य नावांसोबत किशोरी शहाणे-वीज, मैथिली जावकर, वैशाली माडे, अभिजीत केळकर यासारखे तगडे कलाकार यंदा बिग बॉसच्या पर्वात दिसणार आहेत. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस मराठी'चा सेट उभारण्यात आला आहे. पुढचे शंभर दिवस बिग बॉसच्या घरात काय राडे होणार व कोण बाजी मारणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Image may contain: 15 people, people smiling
मराठी पडदा गाजवणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज, महाराष्ट्राची महागायिका म्हणून लोकप्रिय असलेली, बॉलिवूडमध्येही आपला आवाज पोहचवलेली पार्श्वगायिका वैशाली माडे, 'वस्त्रहरण' नाटकात तात्या सरपंच साकारणारा 'कोकणचा आपला माणूस' अर्थात विनोदी अभिनेते दिगंबर नाईक आणि 'सेक्रेड गेम्स' मधली मिसेस काटेकर म्हणजेच नेहा शितोळे, अभिनेत्री मैथिली जावकर, कवीमनाचा राजकीय नेता म्हणून ज्याच्या नावाची चर्चा होती त्या अभिजीत बिचुकले, 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री वीणा जगताप, 'रोडीज'मध्ये सहभागी झालेला अमरावतीचा पोट्ट्या शिव ठाकरे, सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे, देवयानी मालिकेमुळे घराघरात पोहचलेली 'बोल्ड अँड ब्यूटीफूल' शिवानी सुर्वे, 'बाप्पा' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हरहुन्नरी अभिनेते विद्याधर जोशी, मालिकांतून लोकप्रिय झालेला अभिनेता माधव देवचक्के आणि अभिनेत्री रुपाली भोसले, तारुण्य टिकवून असलेला अभिनेता अभिजीत केळकर हे स्पर्धेक बिग बॉसच्या घरात आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या