वीजयंत्रणेपासून सतर्क राहा : महावितरणचे आवाहन

बारामती, दि.११ जून २०१९ (निशिकांत राऊत) : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सतर्क व तत्पर राहा - मुख्य अभियंता श्री.सुनील पावडे
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे. वादळ तसेच पावसामुळे तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ दुरुस्ती काम करून किंवा आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी दिले आहेत. पावसामुळे वीजयंत्रणेत होणारे संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच गंभीर बिघाड असल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सक्रीय राहावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. पावडे यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी. वीज अपघात टाळण्यासाठी जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व सतर्कपणे दुरुस्तीचे काम करावे व नागरिकांनाही वीजअपघात टाळण्याबाबत उपाययोजनांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची व वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.

(निशिकांत राऊत),
प्रभारी जनसंपर्क अधिकारी, बारामती परिमंडल, बारामती
मो.बा. 7875767009

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या