शिंदोडी गावच्या आता उरल्यात फक्त खाणाखुणा...

Image may contain: 4 people, child and outdoorशिंदोडी, ता. १३ जून २०१९ (तेजस फडके) : "अरे पोपट ती झाड पाहिली का लहानपणी किती सुरपारंब्या खेळायचो राव आपण या झाडावर" आणि ते पाहिलं का तिथं नदीचा काठ होता."खरंच की लगा भगवंत तिथं मारुतीचं मंदिर होत आणि तिकडं आपला वाडा होता की राव" जमीन किती सुपीक होती ना राव आमची पण सगळं पाण्यात गेलं.५१ वर्षांनी उघड पडलेलं जुन गाव पाहताना पाणावलेल्या डोळ्यांनी शिंदोडी येथील जेष्ठ मंडळी जुन्या गावच्या भग्नावस्थेत असलेले वाडे,मंदिर, याच्या खुणा डोळ्यात साठवुन जड अंतकरणाने घरी येत आहेत.

शिंदोडी(ता.शिरुर) देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी घोड नदीच्या कडेला असणार हे जेमतेम १००० लोक संख्येच गाव,गावात २-३ वाडे,मारुतीचं मंदिर,मशीद,तालीम,जिल्हा परिषद शाळा अश्या वास्तू होत्या.सन१९४५ साली घोड नदीला पुर आला आणि गावात पाणी शिरलं त्यामुळं गाव पहिल्यांदा विस्थापित झालं.सन १९५४ साली धरणाच्या निर्मितीसाठी या गावच्या जमिनी शासनाने संपादित करायला सुरुवात केली आणि चिंचणी येथे घोड धरणाचे काम सुरु झाले.त्यामुळे गाव पुन्हा एकदा विस्थापित झाले.धरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर १९६८ साली धरणात जसजसा पाणीसाठा वाढु लागला तस शिंदोडी गावाला पाण्यान आपल्या कवेत घेतलं.

Image may contain: sky, outdoor and natureअनेक वर्षे शिंदोडी ग्रामस्थ गावच्या आठवणी विसरुन गेले.वडीलधारी मंडळींच्या पारावर कधी गप्पा रंगल्या तर जुन्या गावचा विषय आवर्जुन निघायचा. दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस आणि घोड धरणांतून होत असलेला बेसुमार पाणी उपसा या गोष्टीमुळे धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने पहिल्यांदा २०१२ साली जुन्या शिंदोडी गावच्या घराच्या भिंतीचे अवशेष नजरेस पडले.त्यानंतर पुन्हा २०१६ साली दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे गावच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आणि आता २०१९ ला संपुर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे पहिल्यांदा घोड धरणाच्या पाण्याने नीचांकी पाणी पातळी गाठल्याने संपुर्ण गावचा परिसर पाहण्याची  संधी शिंदोडीच्या ग्रामस्थांना मिळाली.आज गावातील सगळ्या वाड्यांची पडझड झाली असुन सगळीकडे फक्त दगडांचा खच पडलेला दिसतो.परंतु जुनी जेष्ठ लोक आवर्जुन गाव पाहण्यासाठी जात आहेत.

जुन्या गावच्या आठवणीत सांगताना गावचे माजी सरपंच रंगनाथ वाळुंज म्हणाले, घोड नदीला पुर आल्यावर पहिल्यांदा गाव विस्थापित झालं तेव्हा मी १६ वर्षाचा होतो.आम्ही बैलगाडीन सगळं साहित्य घेऊन नवीन ठिकाणी रहायला गेलो होतो.जुन्या गावच वैशिष्ट्य म्हणजे तेथे मारुतीच मंदिर,खंडोबा तसेच भैरवनाथाच मंदिर,मशीद तालीम सगळं होत.जुन्या शिंदोडी गावात शाळा शिकलेले भगवंत वाळुंज म्हणाले,आम्ही लहान असताना पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळा सुरु झाली ती आमच्या काळातच तेव्हा घोड नदीच्या कडेला पिंपळ,वड, लिंब अशी अनेक झाड होती.नदीच्या कडेला असलेल्या झाडांमुळे गावाला एक वेगळीच ओळख होती.जुन्या गावाबद्दल बोलताना ह.भ.प.रामदास महाराज फडके म्हणाले,जुन्या गावात सगळ्या जाती-धर्माची लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत होती.गावात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने सगळे जण एकमेकांच्या सुख दुःखात सामील होत होते.

सात टी एम सी पाणीसाठा असलेल्या सध्या घोड धरणांतून अंदाजे २०० पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असुन त्यात रांजणगाव औद्योगिक वसाहत,घोडगंगा साखर कारखाना पाणी पुरवठा,श्रीगोंदा पाणीपुरवठा योजना,काष्टी पाणीपुरवठा योजना अश्या मोठया पाणी पुरवठा योजनांचा समावेश असुन दरवर्षी पाऊस कमी असल्याने घोड धरणाच्या पाणी पातळीत घट होत आहे.त्यामुळे दरवर्षी घोडधरणात पाणीसाठा कमी होत आहे.त्यामुळे भविष्यात कायम पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या