पुण्यात पुन्हा भिंत कोसळून 6 ठार; मुंबईत 13 ठार

पुणे, ता. 2 जुलै 2019 : राज्यभर पाऊस पडत असून, भिंतीमध्ये पाणी मुरल्यामुळे भिंती पडण्याच्या घटना घडत आहेत. पुण्यात भिंत कोसळून 6 तर मुंबईत 13 जण ठार झाले आहेत. कोंढवा परिसरात शुक्रवारी सिमाभींत पडून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांत ही घटना घडली आहे.

पुण्यात पुन्हा एकदा सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर पडून सहा जण दगावल्याची घटना आंबेगाव परिसरात सोमवारी (ता. 1) मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.

अग्निशामक दलाने एकूण नऊ जणांना तिथून बाहेर काढले. सहा जणांचा मृत्यू झाला असून चार पुरुष, दोन महिला यांचा त्यात समावेश आहे. तर तीन जण जखमी आहेत. भारती विद्यापीठाच्या अंतर्गत आंबेगाव पोलिस चौकी शेजारी घटना घडली आहे. ही भिंत खाली दगडी बांधकाम त्यावर सिमेंटच्या विटा त्यावर लोखंडी जाळी पंधरा फूट उंचीची भिंत होती. जमिनीत पावसाचे पाणी मुरल्यामुळे जमिनीचा भाग फुगला आणि भिंत पडली. सुमारे 40 फूट लांबीची ही भिंत पडलेली आहे.

पुणेकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा...
पुणे शहर व परिसरात पुढील चोवीस तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने, प्रशासनाने पुणेकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज (मंगळवार) पुणे शहर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. मदतीची गरज भासल्यास पोलिस, अग्निशामक आणि एनडीआरएफ यांना मदतीला बोलवावे असे आवाहन केले आहे. मुंबईला पावसाने झोडपले असतानाच पुण्यातही पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Image may contain: one or more people and outdoor
मुंबईमध्ये भिंत कोसळून १३ जण ठार, १३ जखमी
मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचे आणि मदत करण्याचे काम सुरू आहे. मालाडमध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. याबाबत फायर ब्रिगेडचे जवान सर्च ऑपरेशन करत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. रात्रभर मुंबईत तुफान पाऊन पडतो आहे. त्याचमुळे ही भिंत कोसळली आहे.

मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.त्यामुळे खबरदारीचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज (मंगळवार) सर्व शाळा, महाविद्यालयात, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या