वारीक वारीक वारीक...हजामत करुया बारीक

Image may contain: 2 people, crowd, child and outdoorदेवदैठण, ता.२ जुलै २०१९ (दिपक वाघमारे) : "वारीक वारीक वारीक...हजामत करुया बारीक " या संत एकनाथांच्या भारुडा प्रमाणे देवदैठण (ता.श्रीगोंदा) येथे सुरभी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी पंढरीच्या वारीतील शेकडो वारकऱ्यांची मोफत दाढी व कटिंग करण्यात आली.

पिंपळनेर (ता.पारनेर) येथिल संत निळोबाराय पालखी सोहळयाचे शुक्रवारी (दि.२८) देवदैठण ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत करताना विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत व येथिल भजनी मंडळाने टाळमृदंगाच्या गजर केला. मुक्कामात रात्री सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे दुध संघाचे माजी अध्यक्ष सुरेश लोखंडे व नानासाहेब लोखंडे यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

ज्ञानोबा - तुकोबा असा गजर करत पंढरपूरकडे निघालेल्या पालखी वा दिंडीतील वारकऱ्यांना विविध प्रकारची सेवा पुरवून विठ्ठलाची भक्ति केल्याचा आनंद मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. कुणी चहापाणी, कुणी फराळ - नाष्टा, कुणी भोजन तर कुणी आरोग्य सेवा पुरवताना वारकऱ्यांच्या सेवेतच ईश्वरसेवा मानतात. देवदैठण येथिल सुरभी संस्थेच्या वतीने अध्यक्ष दीपक वाघमारे यांच्या संकल्पनेतून मात्र आगळावेगळा उपक्रम राबविताना शंभराहून अधिक वारकऱ्यांची मोफत दाढी व कटिंग केली.

यावेळी वारकऱ्यांनी वारीक वारीक वारीक..हजामत करुया बारीक हे संत एकनाथ महाराजांचे भारूड म्हणत मोफत हजामतीच्या कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. सुरभीच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात सर्वांनीच कौतुक केले. काशिनाथ गायकवाड, बाबा गायकवाड, बबन गायकवाड, संतोष गायकवाड, महेश शिंदे आदी नाभिकांनी शेकडो वारकऱ्यांची विनामुल्य हजामत करत सुरभीच्या अनोख्या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरभीचे अध्यक्ष दीपक वाघमारे,सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे दुध संघाचे माजी अध्यक्ष सुरेश लोखंडे,डॉ. संतोष भालेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या