शिरूर तालुक्यातील नद्या ओव्हरफ्लो; संपर्क तुटला (Video)

Image may contain: one or more people, outdoor, nature and water
शिरूर, ता. 6 ऑगस्ट 2019: पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्र भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आले आहेत. शिरूर तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे विविध ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

विठ्ठलवाडी येथे भीमा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले
विठ्ठलवाडी : येथे भीमा नदीच्या पुलावरून गेल्या तीन दिवसांपासून पाणी वाहू लागल्याने परिसरातील गावांचा तळेगाव ढमढेरेशी संपर्क तुटला आहे. इंद्रायणी नदीच्या  पुराचे पाणी वढू बुद्रुक येथील भीमा नदीत आल्याने भीमा नदीला पूर आला आहे. सध्या शिरूर, हवेली, दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील  सर्व ८ बंधारे  भरले असून. भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे सांगवी सांडस, पाटेठाण, राहू आदी भागातील नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली असून तळेगाव ढमढेरे चा रस्ता विठ्ठलवाडी सांगवी सांडस दरम्यान पाण्याखाली गेल्याने तळेगाव ढमढेरे गावांशी संपर्क तुटला आहे. सध्या शिरूर, हवेली, दौंड या तीन तालुक्यातील वढू बुद्रुक १६२, पेरणे- ९२, बुर्केगाव- ७३,सांगवी सांडस विठ्ठलवाडी- ९९, पाटेठाण-८६ दशलक्ष फुट क्षमतेचे हे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याचे कोंढापुरी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी सांगितले असून नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विठ्ठलवाडी - मिरगव्हाण रस्त्यावरील पूल पाण्याखाली
Image may contain: 8 people, people smiling, outdoor, nature and water
तळेगाव ढमढेरे : भीमा नदीच्या पाण्याच्या फुगाऱ्यामुळे विठ्ठलवाडी - मिरगव्हाण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मिरगव्हाण वस्तीवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे.

भामा-आसखेड व चासकमान धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस कोसळत असून या दोन्ही धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर भीमा नदीत विसर्ग करण्यात आल्याने भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने विठ्ठलवाडी मिरगव्हाण रस्त्याच्या ओढ्यावरील पुलापर्यंत पाण्याचा फुगारा आल्याने या ओढ्यावर  दुपारी १२ ते १ च्या दरम्यान साधारण तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते. यावेळी नागरिक महत्त्वाच्या कामासाठी पाण्यातून जीव धोक्यात घालून ये-जा करीत होते. परंतु एक वाजल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली व साधारण याच पुलावर पाच ते सहा फुटा च्या खाली पूल  गेल्याने मिरगव्हाण वस्तीवरील नागरिकांचा विठ्ठलवाडी गावाशी संपर्क तुटला व जनजीवन विस्कळीत झाले. लोकांची दिवसभरातील नियोजित कामे कोलमडली गेली तर काही कामगारांना कामावर जाता आले नाही. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास दुसऱ्या दिवशीही या वस्तीवरील लोकांचे जनजीवन विस्कळीत राहणार आहे.

विठ्ठलवाडी मिरगव्हाण रस्त्याच्या ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली गेल्यानंतर मिरगव्हाण वस्तीवरील लोकांचे जनजीवन विस्कळीत होत असते. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला जातो. या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.
- युवराज कातोरे, ग्रामस्थ मिरगव्हाण वस्ती

नद्यांवरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यात संततधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरय़ांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी वाढणार असल्याने विहिरी व बोरवेला मोठा फायदा होणार आहे.

तळेगावात वेळ नदीचे पाणी पुलावरून लागले वाहू...
Image may contain: outdoor, water and natureतळेगाव ढमढेरे येथे वेळ नदीला पुर आल्याने तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील तळेगाव ढमढेरे येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील वाहतुक कांही वेळ ठप्प झाली होती. संततधार पावसामुळे कांही ठिकाणी ओढेही दुथडी भरून वाहू लागले आहेत.
 
गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच धरण क्षेत्रात जारदार पाऊस बरसत असल्याने चासकमानचे पाणी वेळ नदीतून सोडल्याने वेळ नदीच्या पाण्यात वाढ झाली असून तळेगाव ढमढेरे येथे वेळ नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पाण्याचा दबाव जास्त असल्याने तसेच पुलाच्या कठडयाचे संरक्षक दगड दिसत नव्हते. त्यामुळे तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावरील वाहतुक कांही वेळासाठी ठप्प झाली होती. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वाहतुक पुर्ववत सुरू झाली. या पावसाळयातील नदीला आलेला हा पहीलाच पुर असल्याने येथील नागरीकांनी पुराचे व पुलावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

परीसरात दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले मात्र अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वरूणराजा बरसल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पाऊस बरसल्याने व नदीला पाणी आल्याने खरीपासाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने व पाण्याची समस्या सुटल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या