कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिरुरकर सरसावले...
शिरुर, ता. 12 ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : कोल्हापूर, सांगली या भागातील पुरग्रस्तांसाठी शिरुर शहरातुन सोशल मिडियावर मदतीचे आवाहन केल्यानंतर असंख्य मदतीचे हात पुढे येत असुन मदतीचे आवाहन करताच काही तासांत कपडे, धान्य, ब्लॅंकेट, जीवनावश्यक साहित्य नागरिकांनी जमा केले.
या सर्व साहित्याचा एक टेंपो (कंटेनर) शिरुर शहरातुन रवाना करण्यात आला. सांगली, कोल्हापूर या भागात पुराने घातलेल्या विळख्याने असंख्य नागरिक अडचणीत सापडले. त्यांच्या या वेदना शिरुरकरांनी जाणुन घेत फेसबुक, व्हॉट्सअप वर एकप्रकारे मदतीसाठी मोहिम हाती घेण्यात आली. सोशल मिडियावर केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही तासांत समस्त शिरुरकरांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे.या आवाहनानुसार १३० पाण्याचे बॉक्स,४०० ब्लॅंकेट,सॅनिटरी पॅड्स, बिस्किट २० बॉक्स,फरसान,आटाचे २० बॅगा,पोहे आदी साहित्य जमा केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणने १५० ब्लॅंकेट,संजय काळे ५० साड्या, संग्राम हॉटेलच्या संपुर्ण कामगारांनी एक दिवसाच्या पगारातुन मॅगी बॉक्स, संपदा पतसंस्था कर्मचारी व प्रतिनीधींच्या वतीने १०० ब्लॅंकेट, कापड बाजार येथील हेमंत बोरा यांनी २१०० रु.किंमतीचे टॉवेल,श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा मंडळ यांनी बिस्किट बॉक्स,साई प्लेसमेंट चे दत्ताञय शेलार यांनी १०० पाण्याचे बॉक्स,शिरुर एन्व्हायरर्मेंटल फोरम ने उबदार ब्लॅंकेट असे एकुन टेंपो (कंटेनर) भरुन साहित्य जमा करण्यात आले. हे जमा केलेले साहित्य पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्त करणार असल्याचे प्रा. सतीश धुमाळ यांनी सांगितले.
घोडगंगेचे संचालक राजेंद्र गावडे मिञमंडळाच्या वतीने अडीच लाख रुपये किंमतीच्या मेणबत्त्या व जीवनाश्यक साहित्य पाठवण्यात आले. कोल्हापुर, सातारा, सांगली या जिल्हयात आलेल्या पुरामुळे तेथील पुरग्रस्तांसाठी शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेच्यावतीने माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरुर शहर व तालुक्यातुन तीन ट्रक धान्य,७५ हजार रोख रक्कम व जीवनावश्यक वस्तु आदी साहित्य जमा करण्यात आले.हे जमा केलेले साहित्य कोल्हापुर येथील राजाराम बापु सहकारी साखर कारखाना मध्ये शिरुर चे खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्याकडे ६० हजार चपत्या,६०० साड्या, ब्लॅंकेट, कपडे, पाण्याचे बॉक्स तसेच इतर जीवनावश्यक वस्तु सुपुर्द केल्या. त्याचबरोबर अनेक शिरुर शहर व तालुक्यातील व शहरातील अनेक दात्यांनी थेट मदत जमा करत साहित्य सांगली, कोल्हापुर ला स्वखर्चाने पाठविले आहे.
शिरुर तालुक्यात गावोगावी पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्याबाबत मोठ्या पोस्ट केल्या जात असुन अनेक गावांनी सर्वसामान्यांपासुन प्रत्येक जण मदतीसाठी सरसावला आहे. धान्य, जीवनावश्यक वस्तु गोळा केल्या जात असुन अनेक गावांनी कपडे व इतर साहित्य जमा करणे सुरु केले आहे. यासाठी तरुण मंडळे, संस्था, सामाजिक संघटना, सर्व राजकिय पक्ष, व्यक्ती पुढे येत आहेत. नागरिकही उत्सफुर्तपणे पुरग्रस्त बांधवांसाठी मदत देत आहेत.
तरुणाने दारोदारी फिरुन जमा केले धान्य
रांजणगाव सांडस येथील युवक उमेश रणदिवे या तरुणाने सोशल मिडियावर आवाहन केल्यानंतर असंख्य दात्यांनी मदतीचा हात पुढे केला.त्याच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला अन अवघ्या काही तासांतच दोन पोती धान्य जमा झाले. या तरुणाने हे धान्य घरोघरी जाउन जमा केले.
नागरिकांना आवाहन
संकटात असलेल्या आपल्याला बांधवांना सर्वतोपरी मदत करताना जीवनावश्यक वस्तुंबरोबरच जुने कपडे देताना चांगल्या स्थितीतीलच कपडे द्यावेत. महिला, मुली, पुरुष, मुले यांची अंतर्वस्ञे, सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांसाठी शॉर्ट्स, बनियन आदींचा समावेश असावा असे आवाहन केले जात आहे.
टाकळी भीमा ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाकळी भीमा (आकाश भोरडे) : एक मदतीचा हात म्हणून पूरग्रस्त सांगली सातारा कोल्हापूरकरांना टाकळी भीमा ग्रामस्थांच्या वतीने विविध साहित्य पाठवून सामाजिक आपत्ती निवारण कार्यास हातभार लावून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी भीमा गावातील पदाधिकारी व तरुण युवकांच्यावतीने मदतीचा हात म्हणून प्रत्येक घरासाठी जीवनावश्यक वस्तू देण्याचा विचार केला आणि एकाच दिवसात ज्यांना शक्य आहे त्यांनी ते भरभरून दिले. या वस्तूचा टेम्पो कोल्हापूरला पाठवला त्यामध्ये चांगले कपडे, आटा, मोठी कपडे, चटया, ब्लँकेट,धान्य, तांदूळ, डाळ, साखर, रवा, तेल या वस्तू देण्यात आल्या. सकाळी रविवारी ग्रामपंचायत कार्यलयासमोर पूरग्रस्तांसाठी वस्तूची मदत एकत्र करून आकाश घोलप यांनी सामान नेण्यासाठी दिलेल्या टेम्पोत हे सर्व साहित्य भरुन पाठवण्यात आल्या. यावेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक शिवाजी वडघुले, पोलिस पाटील प्रकाश करपे, सरपंच रविद्र दोरगे, ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे, सुनील जाधव, सचिन घुमे, निवास साकोरे, अध्यक्ष विशाल पाटोळे, विक्रम वडघुले, दिनेश वडघुले, संजय कामठे गणेश साकोरे, विशाल वडघुले, संतोष पाटोळे, अमर गरुड, उत्तम वडघुले, निखिल पोखरकर याबरोबर अनेक जण उपस्थित होते यावेळी सर्व मदत करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.