तळेगाव ढमढेरे येथे दगडाने ठेचून युवकाचा खून

Image may contain: text
तळेगाव ढमढेरे, ता. 29 ऑगस्ट 2019 : तळेगाव ढमढेरे येथे अज्ञात मारेकऱ्यांनी एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना बुधवार (ता. 28)  घडली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शेळी बाजार मैदानात वेळ नदीच्या पात्रालगत एका २९ वर्षे वयाच्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाला आहे. यासंदर्भात तळेगाव ढमढेरेचे पोलिस पाटील पांडुरंग विश्वनाथ नरके यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव ढमढेरे येथील शेळी बाजारात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह हा रक्ताने माखलेल्या अवस्थेत व डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत आढळला आला. मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेले दोन दगड होते. त्यामुळे या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, मृत युवकाच्या खिशामध्ये सापडलेल्या आधार कार्डनुसार मृत युवकाचे नाव रुपेश जगतराव वाल्हे (वय २९, रा. सिंहगड रोड, किरकटवाडी, खडकवासला, पुणे) हे आहे.

युवकाचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या