आलेगावातून महसुल प्रशासनाकडुन १७ वेठबिगारांची सुटका

Image may contain: one or more people, people standing, cloud, sky, hat, outdoor and natureआलेगाव पागा,ता.३१ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : राष्ट्रीय बंधुआ मुक्ती मोर्चा, हमाल पंचायत व अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर शिरूर प्रशासनाने 17 कामगारांची आलेगाव पागा येथुन सुटका केली. त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व महसूलच्या पथकाने आलेगावला जाऊन वेठबिगार म्हणून ठेवलेल्या कामगारांची त्यांच्या कुटुंबीयांसह सुटका केली.याबाबत मिळालेली माहिती अशी कि, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळील तितावी गावातील काही कुटुंबे दोन महिन्यांपूर्वी मोहंमद दाऊद या ठेकेदारामार्फत आलेगावातील गुळाच्या गुऱ्हाळावर कामाला आली होती.

त्यात 10 पुरुष, तीन महिला व चार अल्पवयीन मुलांचा समावेश होता. गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसा मोबदला न देता त्यांच्याकडून कामे करवून घेतली जात होती. काही कामगारांनी मूळ गावी जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना जबरदस्तीने रोखण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत लखनौ येथील राष्ट्रीय बंधुआ मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस निर्मल गोराना यांनी पुण्यातील अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीला कळविल्यानंतर समितीचे निमंत्रक नितीन पवार; तसेच चंदनकुमार व ओंकार मोरे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली.

या कामगारांनी मोहंमद दाऊद या ठेकेदाराविरुद्ध गंभीर तक्रारी केल्या असून, गूळ बनविताना त्यात भेसळ केली जात असल्याचेही जबाबात म्हटले आहे. या कामगारांना शुक्रवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. त्यावेळी पुरुष मजुरांना टॉवेल मराठी टोपी तर स्त्री मजुरांना साडी देऊन औक्षण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, चंदन कुमार, ओंकार मोरे, हमाल गोरख मेंगडे, संतोष नांगरे आणि सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या