रांजणगाव एमआयडीसीत 'या' 12 जणांविरुद्ध 'मोका'

No photo description available.शिरूर, ता. 5 सप्टेंबर 2019: रांजणगाव एमआयडीसीत, बेकायदा "हिंद कामगार संघटना' या नावाने युनियनची स्थापना करून, युनियनचे सदस्य होण्यासाठी कामगारांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेण्यासाठी बळजबरी करणाऱ्या 12 जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) पोलिसांनी मंगळवारी (ता. 3) रात्री गुन्हा दाखल केला.

चारुदत्त मनोहर वैद्य (वय 39), जीवन जयंत डंके (वय 38) व शिवाजी गुलाबराव राठोड (वय 34, सर्व रा. शिक्रापूर, ता. शिरूर), मनोजकुमार कचरू पाल (वय 36) विजय विठ्ठल मोकळे (वय 39), सर्जेराव अंबाजी खरात (वय 40) व कैलास प्रेमलाल पटले (वय 35, सर्व रा. वाघोली, ता. हवेली), अशोक देवप्पा धाडकर (वय 37) व संदीप कृष्णराव देशमुख (वय 38 दोघे रा. खराडी, पुणे), किशोर संतोष पाटील (वय 39, रा. पेरणे फाटा, ता. हवेली), नीलेश रमेश शेलार (वय 37, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली) व संतोष तुळशीराम खेडकर (वय 39, रा. चंदननगर, ता. हवेली) यांच्याविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले असल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.

"एलजी' कंपनीतील महिला कामगार जया मनोज पवार (रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी 16 एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. कंपनीतील काही कामगारांनी, युनियन लीडर कैलास कदम याच्या सांगण्यावरून कंपनीमध्ये "हिंद मजदूर संघटना' स्थापन करायची असल्याने, युनियनमध्ये येण्याचा आग्रह प्रत्येक कामगाराकडे धरला व युनियनचे सभासद होण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. संघटनेचा सभासद होण्यास व पैसे देण्यास नकार देणाऱ्या कामगारांना धमकावण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराची खातरजमा करून अंतिम अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करून संबंधितांविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाईला मंजुरी दिली.

एमआयडीसीतील कंपन्यांमधून कामगारांना धमकावण्याचे, वर्गणीच्या नावाखाली बळजबरीपणे खंडणी गोळा करण्याचे प्रकार घडत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही. संघटित गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या