Video: चेअरमन साहेब उत्तर द्या: सुधीर फराटे इनामदार

Image may contain: 1 person, text
भाग - 1
मांडवगण फराटा,ता.९ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील  घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक दिवसांपासुन विविध कारणांनी चर्चेत आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी कारखान्याचे चेअरमन यांच्याकडे कारखान्याच्या कारभाराबाबाबत काही प्रश्न 'चेअरमन साहेब उत्तर द्या' असे म्हणत सोशल मिडियावर उपस्थित केले आहेत. नेमके काय आहेत हे प्रश्न ? यावर सुधीर फराटे इनामदार यांनी याबाबत मांडलेले स्वत:चे मत त्यांच्याच शब्दांत जाणुन घेउया...
१) चेअरमन साहेब घोडगंगा सहकारी कारखाना कार्यक्षेञात असलेल्या व्यंकटेशकृपा या खासगी साखर कारखान्यास घोडगंगा मार्फत किती लाख टन उस आजपर्यंत देण्यात आला आहे ?
उत्तर : घोडगंगा कारखान्याची गाळप क्षमता सरासरी प्रतिदिन ४ हजार ते ४हजार २०० टन इतकी असुन जाणिवपुर्वक जास्त क्षमतेचे उसतोड वाहतुक यंञणा कारखान्यामार्फत भरली जाते.त्यामुळे सभासदांचा उस तोडल्यानंतर वेळेत गाळपास येत नाही.गट खाडी द्यावी लागतात.दरम्यान उस वाळतो,वजन कमी होते,साखर उतारा कमी होतो या कारणांमुळे घोडगंगेच्या सभासदांनी पिकवलेला चांगल्या उता-याचा उस शेतकी यंञणेमार्फत त्या उसाचे सर्व नियोजन केले असतानाही सभासदांची इच्छा नसताना सभासदांच्या पुर्वपरवानगी न घेता व्यंकटेशकृपा या खासगी कारखान्यास पाठवला जातो. यासाठी आपल्या घोडगंगेची सर्व यंञणा वापरली जाते.यामध्ये आयता उस खासगी कारखान्याला जातो. अशा पद्धतीने गेली अनेक वर्षे लाखो टन उस घोडगंगा मार्फत व्यंकटेशकृपा या खासगी कारखान्यास पाठविण्यात आलेला आहे. त्यामध्ये सभसदांचे / कारखान्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

२) घोडगंगा कारखान्याचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना आपण विधानसभा निवडणुक तयारी कामाकरिता हवेली तालुक्यातील मतदारांची माहिती गोळा करण्याचे काम दिले असल्याचे समजते? कारखाना अडचणीत असताना कामगारांची इच्छा नसताना जबरदस्तीने अशी कामे लावणे योग्य आहे काय?
उत्तर : चेअरमन साहेबांनी स्वत:च्या विधानसभा निवडणुक तयारीसाठी घोडगंगा कारखान्यातील अनेक  कर्मचारी व अधिकारी यांची इच्छा नसताना मतदारांची माहिती गोळा करणे,माहिती पञके वाटणे,स्वत:ची जाहिरात करणे अशी कामे करताहेत.त्यापेक्षा ही यंञणा कारखान्याच्या हितासाठी वापरणे गरजेचे आहे.सभासदांची एकरी उस-उत्पादकता वाढविणे,साखर उतारा वाढविणे या कामी मार्गदर्शन करणे,कारखाना गळित वाढवणेकामी सभासदांचे समुपदेशन करणे गरजेचे असताना स्वत:च्या हितासाठी,राजकारणासाठी हे कामगार वापरत आहेत.कामगारांच्या अनेक समस्या असताना सहा महिने पगार नाही अशी परिस्थिती असताना कामगारांचा असा वापर करणे योग्य नाही.

३) हंगामी कामगारांना कारखाना चालु झाल्यापासुन रिटेशन मिळालेले नाही हे खरे आहे का?
उत्तर : कारखाना कामगारांनी सन १९९७ साली ९००ते १००० रु.महिना प्रमाणे काम करुन कारखाना उभारणीमध्ये मोलाचा सहभाग नोंदविला आहे.आपल्या कारखान्यातील हंगामी कामगारांना गेली २० वर्षांमध्ये गळित हंगाम बंद काळामधील पगार (रिटेशन) दिले नाही.अनेक कारखान्यांमध्ये ४० ते ५० टक्के बंद काळात पगार दिला जातो.चेअरमन साहेब आपणाकडुन या हंगामी कामगारांवर खुप मोठा अन्याय होत आहे.अशा माध्यमातुन कोट्यावधी रुपये कामगारांना कमी दिले गेले आहे.

४) कामगारांना १५% टक्के पगारवाढीचा शासनकरार २०१४ साली झालेला असुन सुद्धा कामगारांना आजपर्यंत फरकाची रक्कम दिलेली नाही.हे खरे आहे का ?
उत्तर : आपल्या कारखान्यातील कामगारांना पगारवाढीसंदर्भात साखर कामगार संघटना व राज्य सरकार यांत २०१४ साली १५ टक्के पगारवाढीचा करार झाला.अनेक कारखान्यांनी या कराराची अंमलबजावणी करुन कामगारांना पगारवाढ दिली,परंतु  आजपर्यंत आपण ती पगारवाढ अंमलात आणलेली नाही व कामगारांचे शोषन करत आहात.कामगार अनेक अडचणींतुन जात असताना कारखाना उभारणीत कामगारांचा त्याग मोठा असुन अत्यंत कमी पगारामध्ये काम करुन कामगारांनी मोठे योगदान दिलेले असताना हुकुमशाही पद्धतीने कामगार संघटनांना न जुमानता कामगारांची पिळवणुक करत आहात हा आरोप आहे.

५) चेअरमन साहेब सन २०१६ पासुन कामगारांना ओव्हरटाइम चे पैसे नाही हे खरे आहे का ?
उत्तर : आपल्या कारखान्यातील कामगारांना जादा कामाचे पैसे सन २०१६ पासुन दिलेले नाही.

६) कामगारांचा पी.एफ ची रक्कम वेळेत भरली जात नाही, अनुचित घटना घडल्यास चेअरमन तुम्ही जबाबदार राहणार का ?
उत्तर : आपल्या कारखान्यातील कामगारांना वेळेवर पगार नसल्याने कामगारांची पी.एफ.ची रक्कम वेळेवर भरली जात नाही,तसेच पगारातुन जाणारा विमा हप्ताही वेळेवर भरला जात नाही.कामगारांना अनेक ठिकाणी जोखिम पत्करुन कामे करावी लागतात.त्यामुळे अनावधानाने घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असुन पी.एफ.हप्त्याची रक्कम वेळेत भरली गेली पाहिजे.

७) चेअरमन साहेब घोडगंगा कारखाना राज्यात पहिल्या पाच कारखान्यांमध्ये असेल जाहिर केले होते.आज घोडगंगा राज्यात व जिल्ह्यात किती नंबरवर आहे?
उत्तर : सन २०१५च्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सार्वञिक निवडणुकित मी संचालकपदाचा उमेदवार म्हणुन उभा होतो.यावेळी झालेल्या सभांमध्ये सभासदांनी एकहाती सत्ता द्यावा, घोडगंगा हा राज्यातील जास्तीत जास्त बाजारभाव देणा-या कारखान्यांमध्ये असेल तसेच कारखाना विस्तारीकरण,को-जन विस्तार,डिस्टीलरी क्षमता वाढविण्याचे आश्वासन दिले होते.आजची परिस्थिती पाहता को-जन प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरु नाही.सन २०१८-१९ गाळप हंगामात आपला कारखाना गाळपामध्ये पुणे जिल्हयात ११ व्या क्रमांकावर व साखर उता-यातही ११ व्या क्रमांकावर गेला आहे.बाजारभावामध्ये सोमेश्वर ३३०० रु.देतो आणि आपण २५२० रु.देत आहात अशा पद्धतीने कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे.सभासदांनी मोठ्या विश्वासाने २१-० असा कौल निवडणुकित विश्वास ठेउन कौल दिला परंतु सभासदांचा मोठा विश्वासघात झालेला आहे.

८) कारखान्याचा को-जन प्रकल्प चालु दाखविण्यासाठी रोज किती लाखांचा बगॅस खासगी साखर कारखान्यांकडुन विकत घेतला?
उत्तर : आपल्या कारखान्याचा २०.५ मेगावॉट क्षमतेचा को-जन प्रकल्प व आपल्या कारखान्याकडे ३.५ मॅगावॉट क्षमतेचे टर्बाइन अशी एकुन २४ मेगावॉट लाइट तयार करण्याची क्षमता झाली.हे करण्यापुर्वी कारखान्याच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण होउन मगच को-जन प्रकल्प करणे गरजेचे होते. चुकीच्या निर्णयामुळे कारखाना गाळप क्षमता कमी व को-जन प्रकल्प सुरु राहण्यासाठी बगॅसची गरज जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे को-जन प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालु शकला नाही. हा प्रकल्प १३० दिवसाच्या गाळपामध्ये चालु दाखविण्यासाठी खासगी कारखान्यांकडून  २०० टन बगॅस रोज जादा दराने विकत घ्यावा लागला. यामुळे लाखो रुपये बगॅसपोटी खर्च झाले.हे केवळ योग्य नियोजनाअभावी झाले असून याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन यांनाच घ्यावी लागणार आहे. को-जन प्रकल्पाच्या चुकिच्या निर्णयामुळे सभासदांचे कोटयावधींचे नुकसान झाले आहे.

९) चेअरमन साहेब घोडगंगा कारखान्याचे एक पुरवठादार/ठेकेदार उदय पाटील यांनी केलेल्या कामाचे अनेक वर्षे पैसे न मिळाल्याने कारखान्याच्या चिमनीवर चढुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे हे खरे आहे का ?
उत्तर : आपल्या कारखान्यामध्ये अनेक ठेकेदार,माल पुरवठादार हे कामे करत असतात. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार,अनेक ठेकेदार/पुरवठादारांना अनेक वर्षे कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यांची अनेक हंगामामधील देणी बाकी आहे.अशी अवस्था घोडगंगा कारखान्याची का झाली ? आपण आर्थिक नियोजन करण्यात अपयशी झाल्यामुळे ही वेळ आलेली आहे असे वाटते. केलेल्या कामाचे पैसे मिळविण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीवर ही वेळ येत असेल तर मोठी शरमेची बाब आहे.

१०) चेअरमन साहेब कारखाना कामगार पतसंस्थेच्या मार्फत घेतलेल्या कोट्यावधींचे कर्ज कधी भरणार ?
उत्तर : आपल्या कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्यामुळे सन २०१८-१९ चा गळित हंगाम चालु करण्यासाठी आपल्याकडे पैसे उपलब्ध नव्हते.त्यावेळेस कारखान्यातील कामगारांच्या पतसंस्थेमार्फत पुणे जि.म.सह बॅंकेकडुन कोट्यावधीचे कर्ज कारखाना कामगारांच्या नावावर घेतले.कामगारांना सहा सहा महिने पगार नसल्यामुळे सदर कर्जाचे हप्ते वेळेत जात नाहीत.त्यामुळे कर्मचारी प्रचंड अडचणीत आहे.२० वर्षांपेक्षा जास्त काळ एकहाती सत्ता असताना घोडगंगेवर ही वेळ येणे योग्य नसुन लवकरात लवकर हे कर्ज भरावे.
(क्रमशः)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या