शिरुर-हवेलीत काय असेल निवडणूकीचे चिञ ? (वार्तापञ)

Image may contain: 3 people, people smiling, glasses and close-upशिरुर, ता.३० सप्टेंबर २०१९ (सतीश केदारी) : पितृपंधरवडा संपल्यानंतर राजकिय हालचालींना वेग आला असुन दोन दिवसांत प्रमुख पक्षांची उमेदवार यादी जाहिर होण्याची शक्यता आहे. शिरुर-हवेली या विधानसभेसाठी होणा-या निवडणुकिसाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असुन शिरुर हवेली विधानसभेसाठी तिरंगी लढत होइल असे चिञ सद्यस्थितीत दिसत आहे.


शिरुर हवेली विधानसभेसाठी भाजपा तर्फे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तर राष्ट्रवादीकडुन माजी आमदार अशोक पवार,पुणे जि.प.माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे  उमेदवारी साठी इच्छुक आहे.माञ राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी खरी चुरस अशोक पवार व प्रदिप कंद यांच्यात असुन या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते यांवर बरेचसे शिरुर हवेलीतील चिञ अवलंबुन आहे.अद्यापपर्यंत कुठल्याच पक्षाने उमेदवार जाहिर केलेला नाही.तरी भाजपाचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळेल असा राजकिय जाणकाराचा अंदाज आहे.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अशोक पवार व प्रदिप कंद यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे अनेकांचे लक्ष लागुन आहे.गेल्या पाच वर्षांत शिरुर तालुक्यात बहुतांश संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्यात अशोक पवार यांना यश आले आहे.त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग असुन त्यांचे समर्थक पवार यांनाच उमेदवारी मिळेल असे सांगत आहेत.तर प्रदिप कंद यांनी गेल्या एक ते दिड वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील विविध गावांना भेटी देउन नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या आहेत.जि.प.चे अध्यक्ष असताना कंद यांनी शिरुर तालुक्यात केलेली कामे,दिलेला निधी ही जमेची बाजु असुन त्यामुळे ते सुद्धा प्रबळ दावेदार आहेत.

शिवसेना भाजपा युतीवर बरेच काही अवलंबुन असुन मागिल निवडणुकित १७१८७ इतकी मते शिवसेना उमेदवाराला पडली होती.तसेच मनसेला १३ हजार ६२१ इतके निर्णायक मतदान तालुक्यात झाले होते.जर शिवसेना भाजपा युती न झाल्यास शिवसेनेकडुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर(माउली) कटके हे सुद्धा संभाव्य उमेदवार असु शकतात.जर २०१४ च्या झालेल्या निवडणुकित मोदी लाटेत आमदार पाचर्णे हे १० हजार ९४१ मतांनी विजयी झाले.आमदार पाचर्णे यांना ९२ हजार ५७९ तर  त्यावेळीस चे आमदार अशोक पवार यांना ८१  हजार ६३८ एवढी मते पडली होती.अशोक पवार यांचा दहा हजार ९४१ मतांनी पराभव झाला होता.त्यावेळेस मनसेला पडलेली १३ हजार ६२१ इतकी मते त्यावेळेस निर्णायक ठरली.जर त्यावेळेस मनसेचा उमेदवार नसता तर ती मते राष्ट्रवादीला मिळुन राष्ट्रावादीचा विजय झाला असता.तसेच शिवसेनेला पडलेली १७ हजार १८७ ही मते सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नसुन ती मते युतीची असल्याने ती राष्ट्रवादीला पडणार नव्हती.सन २०१४ च्या निवडणुकित एकुण १३ उमेदवार रिंगणात होते.

अशोक पवार यांच्या विरोधात नाराजीची असलेली सुप्त लाट तसेच मोदी लाटेचा प्रभाव यामुळे पाचर्णे यांचा विजय सुकर झाला.तसेच मागिल २०१४,२००९,२००४ च्या निवडणुकांचा थोडक्यात आढावा घेतला तर २००४ मध्ये शिरुर तालुका हा विधानसभा मतदारसंघ होता,त्यावेळेस आमदार पोपटराव गावडे व भाजपाचे बाबुराव पाचर्णे यांच्यात सरळ लढत झाली.सन १९९५ व १९९९ अशा सलग दोन वेळा गावडे हे आमदार म्हणुन निवडुन आले होते.त्यांच्याविरोधात दोन्ही वेळीस पाचर्णे हेच उमेदवार होते.२००४ ची तिसरी लढत होती त्यामुळे पाचर्णे यांना सहानुभुतीचा फायदा मिळत पाचर्णे हे विजयी झाले.त्यानंतर पाचर्णे यांनी चार वर्षे विरोधी पक्षात काम केले.त्यानंतर २००९ च्या निवडणुकित त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीचा शब्दमिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.माञ निवडणुकिच्या वेळेस घोडगंगा कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने पाचर्णे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणुन निवडनुक लढवली त्यावेळी अशोक पवार यांना ५३ हजार ९३६ तर पाचर्णे यांना ४६ हजार ३६९ इतके मतदान झाले.तर भाजपचे मंगलदास बांदल यांना ३८ हजार इतके मतदान झाले होते.व अपक्ष उमेदवार निवृत्ती अण्णा गवारी यांना २२ हजार मतदान पडले होते.त्यामुळे गवारी यांच्या मतदानाचा फटका पाचर्णे यांना बसला होता.

२००९ च्या निवडणुकित अशोक पवार हे ७५६४ एवढ्या मतांनी विजयी झाले होते.त्यानंतर अशोक पवार यांनी विकासाचा झंझावात करत अनेक विकासकामे केली.तर पाचर्णे हे पुन्हा स्वगृही भाजपात दाखल झाले.त्यानंतर पाच वर्षात अनेक दावे-प्रतिदावे हे झाले.त्यात नागरिकांचा नाराजीचा फटका अशोक पवार यांना बसला व २०१४ च्या विधानसभा निवडणुकित त्यांचा पराभव झाला.सध्याचे राजकिय चिञ पाहता प्रमुख नेते कोण-कुठल्या पक्षात प्रवेश करेल असे चिञ सध्या दिसत नाही.माञ राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्ते हे भाजपात प्रवेश करतानाचे चिञ दिसत आहे.त्यामुळे भाजपात उत्साह तर राष्ट्रवादीत मरगळ असे चिञ दिसत आहे.शिरुर हवेली या मतदारसंघाचे भौगोलिकदृष्ट्या वर्णन करायचे झाल्यास अत्यंत विचिञ हा मतदारसंघ असुन पुर्वी शिरुर तालुका हा एक पुर्ण विधानसभा मतदारसंघ होता माञ २००९ च्या निवडणुकिपुर्वी या मतदारसंघात पुनररचनेत बदल होउन हवेली तालुक्याचा निम्मा भाग शिरुर तालुक्यात विधानसभा क्षेञापुरता जोडला गेला तर शिरुर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली.त्यामुळे जि.प व पं.स.निवडणुकिसाठी शिरुर तालुक्यात हि गावे येतात परंतु विधानसभा निवडणुकिसाठी माञ आंबेगाव विधानसभा क्षेञात हि गावे गेल्याने अशा दुहेरी अवस्थेत तेथील मतदार व कार्यकर्ते सापडले आहेत.

या शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात शिरुर शहर,शिक्रापुर,वाघोली,लोणीकाळभोर,उरळीकांचन,लोणीकंद हि प्रमुख शहरी व निमशहरी गावे येत असुन लोणी काळभोर,उरळीकांचन या ठिकाणी पेट्रोलियम रिफिलिंग सेंटर असुन सध्या गजबजलेला परिसर म्हणुन या भागाची ओळख आहे तर वाघोली हा परिसर पुण्यालगत असल्याने तेथे वाढलेले शहरीकरण जमिनीचे गगनाला भिडलेले भाव त्यामुळे महत्वाचे शहर म्हणुन वाघोलीशहर म्हणुन ओळखले जात आहे.तर शिरुर तालुक्यातील महत्वाची असलेली व तालुक्याचे रुप बदलवलेली पंचतारांकित रांजणगाव औदयोगिक वसाहत ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येत आहे.त्यामुळे या परिसरात अनेक नागरिक वाघोली व परिसरात वास्तव्यास आहे.वाघोली हि ग्रामपंचायत असली तरी तेथे शहरीकरण झालेले आहे.शिरुर तालु्कयाला वरदान ठरलेल्या चासकमान पाण्याचा टेल टु हेड,अस्तरीकरण,चा-यांचा प्रश्न हे आजही कायम आहे.वाघोली ते रांजणगाव या ठिकाणी होणारी प्रचंड वाहतुक कोंडी हि मोठी गंभीर समस्या असुन पुर्वी पुण्याला जायला दोन तास लागत होते.आता जायला चार तास लागत आहे.त्यामुळे या वाहतुक कोंडीने नागरिक प्रचंड वैतागले आहेत.पंचतारांकित वसाहतीत स्थानिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न,रस्त्यांचा व वाहतुक कोंडीचा प्रश्न,मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शिरुर शहरातील कचराडेपो,वाहनतळ,महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे,नाट्यगृहे,क्रिडांगण आदी समस्या प्रचंड भेडसावत असुन हे मुद्दे या निवडणुकित महत्वाचे ठरणार आहेत.या निवडनुकिसाठी प्रशासन सज्ज झाले असुन निवडणुक व प्रशासनातर्फे मतदारयाद्या अद्ययावत करणे सुरु झाले असुन निवडणुक प्रशिक्षण कार्यक्रम व प्रशासनाच्या विविध यंञणा निवडणुक कामी सज्ज झाल्या आहेत.निवडणुक कार्यक्रम सुरु झाला असुन अर्ज भरणे सुरु झाले आहे.पितृपंधरवड्यामुळे गेल्या आठवडाभरात राजकिय हालचाली संथ असल्या तरी सोमवार,मंगळवार, बुधवार हे तीन दिवसांत मोठया राजकिय घडामोडी घडणार असुन प्रमुख आघाडीचे उमेदवार उमेदवारी अर्ज बुधवारी व गुरुवारी भरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शिरुर हवेलीत खरे चिञ हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार असुन तिरंगी लढतच होणार असा अंदाज राजकिय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
सन २०१४ च्या निवडणुकिचा निकाल खालीलप्रमाणे :
विजयी उमेदवार
१) बाबुराव काशिनाथ पाचर्णे(भाजप)  :
पडलेली मते - ९२ हजार ५७९
पराभुत उमेदवार
२) अशोक रावसाहेब पवार(राष्ट्रवादी) : पडलेली मते - ८१ हजार ६३८
३) संजय अमृतराव सातव(शिवसेना) : पडलेली मते - १७ हजार १८७
४)संदिप उत्तमराव भोंडवे(मनसे)    : पडलेली मते - १३ हजार ६२१
बाबुराव पाचर्णे हे १० हजार ९४१ मतांनी विजयी झाले.

एकुण मतदारसंख्या : ३ लाख ८१ हजार २२८
एकुण मतदान केंद्रे : ३७६
पु्रुष मतदार : १ लाख ९८ हजार ९६९
स्ञी मतदार : १ लाख ८२ हजार २४९
इतर मतदार  : १०

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या