शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्याला जागा दाखवा: कोल्हे

Image may contain: 17 people, people smiling
शिरूर, ता. 5 ऑक्टोबर 2019: सत्तेची गुर्मी चढल्याने शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्या लोकप्रतिनिधीला जागा दाखवून द्यावी, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. शिरूर-हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार डॉ. कोल्हे बोलत होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, 'विकासाच्या नावाखाली तोंडाला पाने पुसणाऱ्या दानवरूपी सत्ताधाऱ्यांना खाली खेचून, विजयी दसरा साजरा करण्यासाठी मतदारांनी आता दुर्गावतार घ्यावा. शिवस्वराज्यातील खरे शिलेदार म्हणून माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी भरीव विकासकामांतून लौकिक प्राप्त केला आहे. विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य घडविणारी असल्याने जागृतपणे मतदान करताना ऍड. अशोक पवार यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, अभ्यासू, समाजाविषयी कणव असलेल्या आणि समाजाच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या लोकप्रतिनिधींची बहुमताने निवड करावी. सत्तेची गुर्मी चढल्याने शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्या लोकप्रतिनिधीला जागा दाखवून द्यावी. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे व व्यापक निर्णयांमुळे राज्य सुफलाम्‌-सुफलाम्‌ झाले. अशा नेत्यांवर "ईडी'ची कारवाई करून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे समाजमन डिवचलेय. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.'

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, युवा नेते आदित्य प्रकाश धारिवाल, युवा नेते ऋषिराज अशोक पवार, शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता पवार, राजेंद्र जगदाळे, कुसुम मांढरे, कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ गुजर, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेलीच्या सभापती हेमलता काळोखे, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, शिरूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, सूर्यकांत गवळी, सुनील काळभोर, सनी काळभोर, जितेंद्र बढेकर आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी त्यांनी भव्य रॅली काढून शिरूर शहरात अनोखे शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या रॅलीत शिरूरसह हवेली तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बाजार समितीपासून सुरू झालेली ही रॅली बसस्थानकापर्यंत आली, तरी बाजार समितीपर्यंत गर्दी होती. शहराच्या इतिहासातली "रेकॉर्ड ब्रेक' गर्दी असा उच्चांक या रॅलीतील उपस्थितीने रचला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या