शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीतील त्रुटी दूर कराव्यात

Image may contain: 4 people, people standingतळेगाव ढमढेरे, ता. 9 ऑक्टोबर 2019: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करून निवडणूक पारदर्शी होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने परिषदेचे कार्याध्यक्ष व पुणे विभागाचे माजी  आमदार भगवानराव साळुंखे यांनी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे दिले आहे.
        
विभागीय आयुक्त तथा पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक अधिकारी म्हैसेकर यांना शिक्षक परिषदेच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची जून २०२० मध्ये होणाऱ्या निवडणूक नोंदणी तील त्रुटी दूर करून निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक, पारदर्शक, सुलभ व गतिशील होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

त्यानुसार विविध शैक्षणिक संस्थातील मतदार पात्रतेची अट पूर्ण केलेल्या शिक्षक, प्राध्यापक, निदेशक यांची यादी मागून घेऊन प्राथमिक मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध करावी. मतदार नोंदणी दिनांक १ ऑक्टोबर पासून सुरू होऊनही अद्याप आपल्या कार्यालयाकडून संबंधित तहसीलदारांपर्यंत मतदार नोंदणी अर्ज क्रमांक १८ व १९ पोहोचलेले नाहीत त्यामुळे तातडीने ते अर्ज  पोहोचवण्याची व्यवस्था करावी.

तहसील कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्याकडे अथवा लिपीकाकडे मतदार नोंदणीचे काम सोपवले आहे त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे याकामी शिक्षक परिषद आवश्यक ते सहकार्य करेल. सध्याची विधानसभेच्या निवडणुकीची धावपळ लक्षात घेता मतदार नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवावी. शिक्षकांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून मतदान केंद्र हे कार्यरत शाळा-महाविद्यालयाच्या जवळपास द्यावे त्यामुळे  मतदानाचा टक्का वाढेल.

 सध्या विविध राजकीय पक्ष, शिक्षक संघटना, स्वयंसेवी संस्था शाळांमध्ये जाऊन शिक्षकांची मतदार नोंदणी करताना आढळतात त्यामुळे दुबार-तिबार मतदार नोंदणी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शिक्षकांना एकदाच फॉर्म भरून देण्याबाबत आपल्या कार्यालयाकडून सूचना कराव्यात. शिक्षक परिषदेने सुचवलेल्या उपाययोजनावर कार्यवाही करण्याबाबत योग्य तो विचार केला जाईल असेही शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांना विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले.

यावेळी राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष माजी आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव गवळे, जितेंद्र पवार, निलेश काशीद, मोहन ओमासे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या