शिरुर-हवेलीच्या आमदाराचे भविष्य हवेलीकरांच्या हाती?

Image may contain: sky and outdoorशिरुर,ता.९ सप्टेंबर २०१९(अभिजित आंबेकर) : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात राजकिय समिकरणे प्रथमच बदलुन गेली असुन हवेलीतील जनता कोणाच्या मागे राहणार यावर शिरुर-हवेलीच्या भावी आमदाराचे भविष्य अवलंबुन असणार आहे.

शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी १५ उमेदवारांपैकी ५ जणांनी अर्ज माघार घेतल्याने दहा उमेदवार रिंगणात आहेत.भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे विरुद्ध राष्ट्रवादी कॉग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्यातच प्रामुख्याने दुरंगी लढत होत असल्याचे चिञ स्पष्ट झाले आहे.या निवडणुकित दुरंगी लढत होत असली तरी मनसे व वंचित आघाडीचेही उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असल्याने या दोन्ही पक्षांची मतेही निर्णायक ठरणार आहेत.अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके या मातब्बर उमेदवारांनी निवडणुकीतुन माघार घेतली आहे.शिरुर हवेलीत प्रथमच राज़किय वातावरणाला कलाटणी मिळाली असुन जि.पचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांना जाहिर पाठिंबा  व्यक्त करुन आपण लवकरच मुख्यमंञ्यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश  करणार असल्याचे पञकार परिषदेत सांगितल्याने शिरुर-हवेलीतील राजकिय गणिते संपुर्ण बदलुन गेली आहे.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी (दि.४) पर्यंत एकुण १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.उमेदवारी अर्ज छाननीत तीन अर्ज बाद झाल्यानंतर १५ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे बंडखोर पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद व माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली होती.दरम्यान मोठे शक्तिप्रदर्शन करत प्रदिप कंद व मंगलदास बांदल यांनी मोठा मेळावा आयोजित केला होता.तर शिवसेनेचे कटके यांनी वाघोली येथे शिवसैनिकांची आढावा मेळावा आयोजित केला होता.हे तिघेही मैदानात उतरतात कि काय असे चिञ निर्माण झाले असताना या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडनुकितील चुरस कमी होउन दुरंगी लढतीवरच हे चिञ थांबले आहे.माञ असे असले तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कटके यांनी आपण युतीधर्म पाळणार आहे असे सांगितल्याने प्रत्यक्षपणे याचा फायदा भाजपाचे उमेदवार पाचर्णे यांना होणार आहे.दरम्यान  राष्ट्रवादीत तिकिट न मिळाल्याने व पक्षाने विश्वासात न घेतल्याने पक्षाला कंटाळुन प्रदिप कंद यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आमदार बाबुराव पाचर्णे यांची समर्थकांसमवेत भेट घेत जाहिर पाठिंबा दिल्याने पाचर्णे यांना प्रत्यक्षपणे बळ मिळाले आहे.तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी प्रदिपदादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला पाठिंबा  देउ असे म्हणाल्याने त्याचाही अप्रत्यक्षपणे फायदा आमदार बाबुराव पाचर्णे यांनाच होणार आहे.पुर्व हवेलीत असलेला कंद यांचा संपर्क तसेच शिक्रापुर व रांजणगाव सांडस या दोन्हीही गटात मंगलदास बांदल यांचे असलेले प्राबल्य तसेच संपुर्ण मतदारसंघात त्यांचे असलेले समर्थक यामुळे या दोघांचीही भुमिका महत्वपुर्ण मानली जात असुन माजी आमदार अशोक पवार यांनाच ही भुमिका मोठी अडचणीची ठरणार असे राजकिय जाणकारांकडुन बोलले जात आहे.

शिरुर हवेलीच्या निवडणुकित प्रमुख पक्षांबरोबरच ज्यांना दुर्लक्षुन चालणार नाही असे मनसेचे कैलास  नरके व वंचित आघाडीचे चंदन सोंडेकर यांची भुमिकाही महत्वाची मानली जाते.सन २०१४ च्या निवडणुकित मनसेने १३ हजार पेक्षा जास्त मतदान घेतले होते तर लोकसभेत वंचित बहुजन आघाडी ला मिळालेले यश पाहता वंचित आघाडी सुद्धा निर्णायक भुमिका घेउ शकते.या दोघांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षाच्या दोन्हीही उमेदवारांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रे असुन शिरुर हवेलीमध्ये पुरुष मतदार १ लाख ९८ हजार ९६९ तर महिला मतदार १ लाख ८२ हजार २४९ व इतर १० असे मिळुन ३ लाख ८१ हजार २२८ एवढे मतदार आहेत.हवेलीत प्रथमच सर्वच कार्यकर्ते एकञ येत असुन प्रदिप कंद समर्थकांची एकजुट व हवेलीकरांची भुमिका या निवडणुकित महत्वपुर्ण ठरणार असुन हवेलीकरच शिरुर हवेलीचा २०१९ चा आमदार ठरवणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या