पैशांचा पाऊस पाडणाऱया तीन मांत्रिकांना सक्तमजुरी

शिरूर, ता. 15 ऑक्टोबर 2019: पैशांचा पाऊस पाडून मालामाल करून टाकतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघा मांत्रिकांना शिरूर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सागरनाथ मिठानाथ परमार, चंदूनाथ सागरनाथ परमार व पटेलनाथ संजूनाथ चौव्हान (तिघे रा. सतलसा, गुजरात) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. शिरूरचे न्यायाधीश आर. डी. हिंगणगावकर यांनी सोमवारी (ता. 14) तिघांना शिक्षा सुनावली. 22 डिसेंबर 2016 ते 16 जानेवारी 2017 या दरम्यान, संबंधितांनी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील अमोल शशिकांत वाबळे यांची फसवणूक केली होती. याबाबत त्यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती.

वाबळे यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना शिक्रापूर येथील स्मशानभूमीत बोलावले. त्या वेळी पूजेसाठी बसवून एका मडक्‍यात इंदिरा गांधींचे चित्र असलेले एक रुपयाचे नाणे टाकायला सांगितले. त्यानंतर मडक्‍याचे तोंड लाल कापडाने बांधून काही वेळ पूजा केली व पूजेनंतर मडक्‍याचे तोंड उघडून त्यातून पन्नास रुपयांच्या दीडशे ते दोनशे नोटांचा पाऊस पाडल्याचे भासवले. अशा प्रकारे तुम्हाला पैशांचा पाऊस पाडायचा असेल आणि मालामाल व्हायचे असेल, तर स्मशानी धूप घेण्यासाठी सुरवातीला नऊ हजार रुपये घेतले. त्यानंतरही आणखी मोठ्या प्रमाणात पूजाअर्चा, मंत्रोपचार व मोठा पाऊस पाडण्यासाठी आणखी पैसे लागतील, असे सांगून वेळोवेळी बॅंक खात्यात पैसे भरण्यास लावले.

दरम्यान, या मांत्रिकांच्या आमिषाला भुलून वाबळे यांनी त्यांच्या बॅंक खात्यात सुमारे चार लाख वीस हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर अनेक दिवस उलटल्यानंतरही कुठलाही पैशांचा पाऊस त्यांनी पाडला नाही. अनेकदा विचारणा केली असता टाळाटाळ केली, संपर्क टाळला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वाबळे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे धाव घेऊन संबंधितांविरुद्ध तक्रार दिली.

या आरोपींना शिरूर न्यायालयाने फसवणूकप्रकरणी तीन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील डी. ए. वाकणकर व एस. एम. आरणे यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्‍तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या